Asia Cup 2022 ‘त्याला विसरलेच कसे’, टीम इंडियाच्या निवडीवरून दिग्गजांचा संताप; BCCI वर निशाणा

यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) हिंदुस्थानच्या संघाची घोषणा सोमवारी रात्री करण्यात आली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलचे (KL Rahul) हिंदुस्थानच्या संघात पुनरागमन झाले आहे, तर दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांना वगळण्यात आले. मात्र या संघनिवडीनंतर टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कपला मुकणार असल्याने त्याच्या अनुपस्थितीमध्ये अनुभवी खेळाडू मोहम्मद शमीकडे (Mohammed Shami) वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवण्यात येईल असे वाटत होते. परंतु निवड समितीने शमीला डावलले, व अर्शदीप सिंग आणि आवेश खान सारख्या नवख्या खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे निवड समितीवर माजी खेळाडूंनी ताशेरे ओढले आहेत.

टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी सदस्य के. श्रीकांत यांनी आशिया कपमध्ये मोहम्मद शमीला संधी मिळायला हवी होती असे म्हटले आहे. आशिया कपसाठी मला संघ निवडायला दिला असता तर मी शमीची निवड नक्कीच केली असती. शमीने आपला अखेरचा टी-20 सामना गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही.

 

दुसरीकडे माजी खेळाडू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने देखील निवड समिती मोहम्मद शमीला कशी विसरली असे सवाल केला आहे. मोहम्मद शमीला कसे विसरलात हे कळत नाही. त्याने चांगली कामगिरी केलीय, आयपीएलमधील त्याची आकडेवारीही दमदार आहे. आवेश खान ऐवजी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्याची गरज होती, असे आकाश चोप्रा म्हणाला. तसेच आपण डोळे झाकून आवेशऐवजी शमीची निवड केली असती. बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये शमीला संधी मिळायला हवी होती, असेही आकाश चोप्रा म्हणाला.

दरम्यान, आशिया कपची सुरुवात 27 ऑगस्टपासून होत असून हिंदुस्थानचा पहिला सामना 28 ऑगस्टला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

आशिया कपसाठी हिंदुस्थानचा संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह आणि अवेश खान.

स्टँडबाय खेळाडू – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर