
मैदानावर एका नजरेने फलंदाजांना दरारा दाखवणारे पंच माधव गोठोसकर आज वयाच्या 98 व्या वर्षीही क्रिकेटच्या आठवणी सांगताना तितकेच उत्साही दिसले. कसोटी पंच माधव गोठोसकर यांचा 98 वा वाढदिवस शिवाजी पार्क जिमखान्याने पुण्यात त्यांच्या निवासस्थानी जाऊन साजरा केला. वयाची शंभरी अवघ्या दोन पावलांवर असली तरी त्यांचे क्रिकेटवरचे प्रेम आणि आठवणींचा खजिना मात्र आजही तितकाच ताजा आहे.
59 वर्षे शिवाजी पार्क जिमखान्याशी जोडलेले असलेले गोठोसकर यांनी सदस्य, कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि विश्वस्त अशा विविध भूमिका समर्थपणे निभावल्या. मैदानावरील शिस्तीबाबत त्यांचा करारी बाणा सर्वश्रुत होता. त्यांच्या एका निर्णयावर सामना फिरायचा. मात्र आज जिमखान्याच्या पदाधिकाऱयांनी दिलेल्या प्रेमाच्या भेटीने हाच कडक पंच भावुक झाला. ‘गोठोसकर शतायुषी व्हा,’ या जिमखान्याच्या शुभेच्छांचा गोठोसकरांनी स्नेहपूर्वक स्वीकार केला. यंदाही त्यांनी आपल्या तिजोरीत असलेला जुन्या क्रिकेटच्या आठवणींचा अक्षरशः खजिनाच उघडला. आता 98 व्या वाढदिवशीही त्यांचा खणखणीत आवाज आणि क्रिकेटविषयीचा उत्साह पाहून पदाधिकारी भारावून गेले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिमखान्याचे सरचिटणीस संजीव खानोलकर, सदस्य प्रसन्ना आजगावकर आणि विलास जोशी यांनी पुणे गाठले.
























































