लंकादफन! हिंदुस्थानने आशिया चषकावर नाव कोरले, सिराजच्या बुलडोझरपुढे लंकेचा पन्नाशीतच चेंदामेंदा

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाची टांगती तलवार होती. दोन तासानंतर शंभर टक्के पावसाची शक्यता असताना मोहम्मद सिराजच्या झंझावाती मार्याने सूर्यास्तापूर्वीच हिंदुस्थानला आशियाचा राजाचा मान मिळवून दिला. सिराजने 21 धावांत 6 विकेट टिपताना श्रीलंकेचा डाव 50 धावांत संपवला आणि हिंदुस्थानने 37 चेंडूंतच हिंदुस्थानचा विजयोत्सव साजरा केला. सिराजच विजयाचा शिल्पकार ठरला तर मालिकेत 9 विकेट टिपणारा कुलदीप यादव मालिकावीर ठरला.

यंदा आशिया चषकात भन्नाट आणि अफलातून कामगिरी करण्याऱया श्रीलंकेने आज सर्वांचा अपेक्षाभंग केला. हिंदुस्थानला झुंजवताना त्यांनी पाकिस्तानचा शेवटच्या चेंडूवर हृदयाचे ठोके चुकवणारा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती, पण आज त्यांच्या फलंदाजांनी माती खाल्ली. सिराजच्या गोलंदाजीपुढे त्यांचा एकही फलंदाज उभा राहिला नाही. परिणामतŠ श्रीलंकेचा डाव 15.2 षटकांत कोसळला आणि हिंदुस्थानच्या सलामीवीरांनी सातव्या षटकांतच हिंदुस्थानच्या आशिया चषकावर शिक्कामोर्तब केले.

श्रीलंकेकडून कुसल मेंडिस सर्वोत्तम

श्रीलंकेच्या डावात आज चक्क पाच भोपळे होते. त्यांच्याकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 17 धावा केल्या तर त्याने दासुन हेमंथाबरोबर केलेली 21 धावांची भागी सर्वोच्च ठरली. त्यांचे आघाडीचे सहा फलंदाज अवघ्या 12 धावांत बाद झाले तेव्हा श्रीलंका आज निच्चांक गाठणार असेच वाटत होते, पण मेंडिस आणि हेमंथाने हे टाळले. हे दोघेच दोन अंकी धावा करू शकले.

129 चेंडूंचा अंतिम सामना

12 धावांत 6 फलंदाज बाद झाले तेव्हा केवळ 34 चेंडूंचाच खेळ झाला होता, पण त्यानंतर श्रीलंकेने आणखी दहा षटके किल्ला लढवला. श्रीलंकेचा पूर्ण संघ 15.2 षटकांत बाद झाला. म्हणजेच 92 चेंडूंत 50 धावा करून श्रीलंकन तंबूत परतले. त्यानंतर हिंदुस्थानी सलामीवीरांनी 31 चेंडूंत बिनबाद लक्ष्य गाठले आणि हा जेतेपदाचा सामना 129 चेंडूंतच आटोपला. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता होती, पण अवघ्या दोन तासांतच जेतेपदाची ही लढत आटोपल्यामुळे पावसाचे  संकटच आपोआप टळले.