वाह! सिराज मियाँ

>>द्वारकानाथ संझगिरी

श्रीलंकेने टॉस जिंकून फलंदाजी घेतली आणि मी घरी आशिया कपचा अंतिम सामना पाहायला जमलेल्या मित्रांचे चहाचे कप भरले.

संध्याकाळच्या हिंदुस्थानी फलंदाजीसाठी फ्रीजमध्ये बीअर थंड होत होती. तिकडे टीव्हीवर रवी शास्त्र सांगत होता, ‘परेरा हा धोकादायक फलंदाज आहे.’ इतक्यात बुमराचा सुंदर आऊट स्विंगर डावखुऱया परेराच्या बॅटचं चुंबन घेऊन यष्टिरक्षक राहुलच्या ग्लोव्हजच्या बाहूपाशात विसावला. चिअर्स म्हणून आम्ही चहाचे कप उंचावले.

बुमराच्या स्विंगपेक्षा त्याच्या टप्प्याचं आणि चेंडूच्या योग्य दिशेचं मला कौतुक वाटलं. ‘तुमने पुकारा और हम चले आये’ म्हणत बॅट त्या चेंडूकडे झेपावली होती. पण तरी पुढच्या वादळाची कल्पना नाही आली. आणि ते चहाच्या पेल्यातलं वादळ नाही ठरलं.

सिराज अलीकडे वोबल स्विंग (wobble swing) या प्रेमात पडलेला गोलंदाज आहे. कसोटीत तो त्याचा जास्त वापर करतो. पण त्याच्याकडे अतिशय चांगला आऊट स्विंगरही आहे, ही गोष्ट तो कधी कधी विसरतो. काल तो आऊट स्विंगर त्याच्यावर बेहद्द खूश होता. चेंडू स्विंग होत होता आणि त्याने चेंडू फलंदाजांना ड्राईव्हसाठी ‘खिलवले’. कधी स्टम्पजवळ जाऊन तर कधी स्टंपपासून दूर जाऊन त्याने आऊट स्विंगर टाकले. त्याचं दुसरं षटक मॅच संपवून गेलं. सुखकर्ता दुःखहर्ता संपायच्या आत घालीन लोटांगण सुरू झालं.

निसंकाचा ड्राईव्ह पॉइंटला जाडेजाने गोळी झेलावी तसा झेलला. त्याचा तळहात लाल झाला नसेल तर तो लोखंडाचा आहे. नंतर आलेल्या सदीरा समराविक्रमाने सोडला. त्याने पुढच्या चेंडूकडून आऊट स्विंगची अपेक्षा ठेवली. तो चेंडू आत आला आणि त्याला पायचीत करून गेला. पुढचा असलांका अधीच्याला ठेच लागून शहाणा व्हायला तयार नव्हता. अरे एक चेंडू नीट पहा तर! त्याला वाटलं आपण अरविंद डिसिल्वा, गेला कव्हर ड्राईव्ह मारायला. बॅट हलली, पाय नाही. काय होणार? कव्हरमध्ये सोपा झेल किशनकडे गेला. सिराज त्यामुळे हॅटट्रिकच्या उंबरठय़ावर उभा होता. रोहितने सर्व क्षेत्ररक्षक मागे ठेवले. साहजिकच त्याने पुढच्या धनंजय डिसिल्वाला पुढे टाकला. त्याने तो सरळ ढकलला. समोर रान मोकळं होतं, पण सिराजच्या अंगात संचारलं होतं. तो चेंडू अडवायला सीमारेषेपर्यंत धावला. पुढचा चेंडू पुन्हा आऊट स्विंगचं रूप घेऊन धनंजयकडे झेपावला. ड्राईव्हचं आव्हान देऊनच तो झेपावला होता, पण हा ड्राईव्ह अडवायला सिराजला कुठे धावावं लागलं नाही. त्याचं, ‘जाते थे जापान पहुंच गये चीन’ झालं. राहुलने मागे झेल घेऊन आपला फिटनेस पुन्हा अधोरेखित केला.

सिराजने दोन षटकं टाकली होती, चार धावा दिल्या होत्या, चार बळी घेतले होते. आणि ते स्वप्न नव्हतं.

पण त्याची पुढची कर्णधार शनाकाची विकेट ही स्वप्नवत होती. तीन आऊट स्विंगरवर त्याने शनाकाला बिट केलं. मग तो क्रिझच्या टोकाला गेला. आणि मधल्या डाव्या यष्टीवर आऊट स्विंग टाकला. साहजिकच फलंदाज ऑनला खेळायला गेला. चेंडू आऊट स्विंग होऊन कधी ऑफ स्टंप घेऊन गेला कळलंच नाही. 16 चेंडूंत 6 बळी मिळाले आणि शेवटी 21 धावांत 6 बळी घेतले. स्वप्न भासावं असं सत्य इतिहास झालं. सिराज सुखावला. कारण त्याला आऊट स्विंगवर कारकीर्दीत इतके बळी कधी मिळाले नव्हते. आऊट स्विंगर हे ब्रह्मास्त्र आहे हे त्याला उमगलं.

आमचा वासू परांजपे नेहमी म्हणायचा, क्रिकेटमध्ये आऊट स्विंग नसता तर सर लेन हटनने 2 लाख चार हजार पाचशे दहा धावा केल्या असत्या. उत्तम दिशा आणि टप्पा असलेला आऊट स्विंग ही मेनका आहे. अनेक विश्वमित्र तिने पचवले आहेत. श्रीलंकेचे फलंदाज मोहात पडले याचं आश्चर्य वाटायला नको.
बीअरची वेळ यायच्या आत मॅच संपली. तरी बीअर फोडल्या गेल्या. ती फसफसून बाहेर आली, पण मटण रश्याबरोबर बीअर पिण्यात मजा आहे, ती अळूच्या फदफद्याबरोबर नाही.

सिराजमध्ये फक्त एक गुणवान गोलंदाज नाही त्याच्यात एक उदार कर्ण आहे. त्याला मिळालेले 5000 डॉलर्स त्याने खेळपट्टी सांभाळणाऱया माळय़ांना वाटले. सिराज स्वतः दारिद्रय़रेषा ओलांडून वर आलाय. एकेकाळी एका बिर्याणीसाठी मॅच खेळायचा, पण त्या स्तराला तो विसरला नाहीये. त्याने माळय़ांचं काम, श्रम पाहिले आणि खिसा रिकामा केला. ते त्याच्या ना धर्माचे, ना देशाचे. त्याने एकच धर्म पाहिला. एक रक्त ओळखलं. क्रिकेटचं. मिया सलाम.