
Asia Cup 2025 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना दुबईमध्ये UAE विरुद्ध खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून UAE ला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा नाणेफेक कोण जिंकणार यावर स्थिरावल्या होत्या. अखेर सूर्यकुमार यादवने बाजी मारली आणि नाणेफेक गमावण्याची सुरू असलेली टीम इंडियाची परंपरा मोडित काढली.
टीम इंडियाने मागील 15 सामन्यांमध्ये एकदाही नाणेफेकीचा कौल जिंकलेला नाही. 28 जानेवारी 2025 रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकली होती. मात्र, त्यानंतर सलग 15 सामन्यांमध्ये टीम इंडियाला नाणेफेकीचा कौल गमवावा लागला होता. इंग्लंड दौऱ्यात सर्व पाच कसोटी सामन्यांमध्ये शुभमन गिलने नाणेफेक गमावली, त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा टीम इंडियाचा नाणेफेक जिंकता आली नाही. तसेच इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडनेच नाणेफेक जिंकली. अखेर आशिया चषकामध्ये टीम इंडियाची सुरुवात नाणेफेक जिंकून झाल्याने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
उभय संघांमध्ये सामना सुरू झाला असून टीम इंडियाने सामन्यावर चांगली पकड निर्माण केली आहे. 9 षटकांचा खेळ संपला असून 50 धावांवर UAE चा अर्धा संघ तंबूत परतला आहे. कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या असून जसप्रीत बुमराह आणि वरून चक्रवर्तीने 1 विकेट घेतली. 9 षटकांचा खेळ संपला तेव्हा UAE ने 5 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा केल्या होत्या.