
आशिया कपच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सुपर-4 मध्ये बांगलादेशचा पराभव करताच हिंदुस्थानने झोकात अंतिम फेरी गाठली, तर दुसरीकडे पाकिस्ताननेही बांगलादेशला नमवत फायनलचे तिकीट मिळवले. त्यामुळे फायनलमध्ये हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी आमनेसामने येतील. विशेष म्हणजे तब्बल 41 वर्षानंतर आशिया कपच्या फायनलमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान लढत होणार आहे.
आशिया कप पहिल्यांदा 1987 मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर आतापर्यंत आशिया कपचे 17 हंगाम खेळले गेले. 1984 ते 2025 मध्ये 41 वर्षांचे अंतर असून आशियातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदा हिंदुस्थान-पाकिस्तान विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. 28 सप्टेंबर रोजी हा सामना खेळला जाईल.
हिंदुस्थानने ही स्पर्धा सर्वाधिक 8 वेळा जिंकलेली आहे. 1984, 1988, 1990–91, 1995, 2010, 2016, 2018, 2023 या वर्षी हिंदुस्थानने आशिया कप उंचावला. दुसरीकडे पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये या स्पर्धेवर विजयी मोहोर उमटवलेली आहे. तर श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022 असे सहा वेळा हा कप जिंकला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकदाही फायनलमध्ये हिंदुस्थान समोर पाकिस्तानचा संघ आलेला नाही. मात्र यंदा हा योग जुळून आला आहे.
1986 चा आशिया कप खेळला नाही
हिंदुस्थानने 1986 चा आशिया कप खेळला नव्हता. त्यावेळी श्रीलंकेसोबत हिंदुस्थानी क्रिकेटचे संबंध चांगले नव्हते. तर दुसरीकडे पाकिस्ताननेही 1990-91 मधील स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता. यामुळेच 1993 चा आशिया कपही रद्द झाला होता.
हिंदुस्थानची आज श्रीलंकेविरुद्ध औपचारिक लढत, सूर्यकुमारची सेना मागील चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील
तिसऱ्यांदा जिरवण्याची संधी
यंदाच्या आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा हिंदुस्थान आणि पाकिस्तान संघात लढत होईल. याआधी साखळीत आणि सुपर-4मध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानला पराभूत केले होते. त्यामुळे एकाच स्पर्धेत पाकिस्तानची तीन वेळा जिरवण्याची संधी हिंदुस्थानकडे आहे.