
आशिया कपमधील संघांचा दुबळा खेळ पाहून हिंदुस्थानी संघासमोर सारे पाणीकम असल्याचा दावा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केला आहे. एवढेच नव्हे तर स्पर्धेत प्रतिस्पर्धाच नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकन संघाचा समावेश करून या स्पर्धेला ऍफ्रो-आशियाई कपचे स्वरूप द्यावे. अन्यथा या स्पर्धेतील सारे सामने एकतर्फी होतील, अशी भीती त्याने बोलून दाखवली. या स्पर्धेत हिंदुस्थानला आव्हान देईल असा अफगाणिस्तानचाच संघ दिसतोय. पण त्यांच्याकडे दर्जेदार गोलंदाज असले तरी जर हिंदुस्थान 170 पेक्षा अधिक धावा उभारल्या तर त्याचा पाठलाग करणे अफगाणिस्तासाठी अशक्य आहे. अफगाणी संघाला जिंकायचे असेल तर त्यांना हिंदुस्थानला 155 धावांवर रोखणे हाच एकमेव मार्ग असल्याचेही अश्विन म्हणाला. दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तानने हाँगकाँगला 94 धावांनी पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानने युएईचा 93 चेंडू राखून पराभव केला. पहिल्या दोन सामन्यांमधील खेळ पाहता आशिया कपचे सारे सामने एकतर्फी होण्याची दाट शक्यता आहे.