
सामना ऑनलाईन , जकार्ता
मनजीतची सुवर्ण धाव
अॅथलीट मनजीत सिंगसह हिंदुस्थानच्या इतर खेळाडूंनी मंगळवारी आपली धमक दाखवत हिंदुस्थानच्या पदकांची संख्या 50 वर नेली. मनजीत सिंगने पुरुषांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्डन धाव घेत हिंदुस्थानला नववे सुवर्णपदक मिळवून दिले. याच शर्यतीत जिन्सन जॉन्सन याने रौप्यपदकावर मोहोर उमटवली. मिश्र 4 X 400 रिले शर्यतीत हिंदुस्थानने रौप्यपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.
मानाच्या स्पर्धेतील पहिलेच पदक
मनजीत सिंगने 1.46.15 अशी वेळ देत आशियाई क्रीडा स्पर्धांत 800 मीटर धावण्याची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. आशियाई क्रीडा स्पर्धांत त्याने पहिलेच सुवर्णपदक जिंकताना जबरदस्त कामगिरी केली. शेवटची 200 मीटर शर्यत बाकी असताना मनजीत सिंग पाचव्या स्थानावर होता, पण अखेरच्या क्षणांमध्ये त्याने झोकात पुनरागमन करताना प्रतिस्पर्ध्यांना लीलया मागे टाकले. जिन्सन जॉन्सनने ही शर्यत 1.46.35 अशी वेळ देत पूर्ण केले. त्याने दुसरा क्रमांक पटकावला. कतारच्या अबू बाकर याने 1.46.38 वेळ देत कास्य पदक जिंकले.
मिश्रमध्येही सुसाट
हिंदुस्थानच्या धावपटूंनी मिश्रमधील 4 X 400 मीटर धावण्याच्या शर्यतीतही शानदार कामगिरी केली. रेसिंग ट्रकवर सुसाट धाव घेत रौप्य पदक जिंकले. हिंदुस्थानच्या संघात राजीव अरोकिया, मोहम्मद अनास, हिमा दास, एम. आर. पुवम्मा या खेळाडूंचा समावेश होता. बहरीनने यामध्ये सुवर्ण तर कझाकस्तानने कास्य पदक पटकावले.
कुराशमध्ये दोन पदकांची कमाई
कुस्तीसारखाच खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुराशमध्ये हिंदुस्थानने दोन पदकांची कमाई केली. मध्य आशियात बहुतांशी खेळल्या जाणाऱ्या या खेळामध्ये हिंदुस्थानकडून पिंकी बलहारा हिने रौप्य व मालाप्रभा यल्लाप्पा जाधव हिने कास्यपदक पटकावले. उझबेकिस्तानच्या गुलनोर सुलायमानोवा हिने 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीच्या लढतीत पिंकी बलहारा हिला 10-0 असे हरवले आणि सुवर्णपदकावर हक्क सांगितला. या पराभवामुळे पिंकी बलहाराला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. गुलनोर सुलायमानोवा हिच्याचकडून मालाप्रभा यल्लाप्पा हिला पराभूत व्हावे लागले. अखेर ती कास्यपदकाची मानकरी ठरली.



























































