अनफिट खेळाडूंचे हाँगझाऊचे तिकीट कापले, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून 19 खेळाडूंना वगळले

10आयसीसी वर्ल्ड कपपूर्वी हिंदुस्थानात आशियाई क्रीडा स्पर्धेचा फिव्हर असेल. येत्या 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान चीनच्या हाँगझाऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार असून आजवरची सर्वोत्तम सोनेरी कामगिरी करण्यासाठी हिंदुस्थानी पथकातील 19 अनफिट खेळाडूंचे तिकीट कापण्यात आले आहे. यात फुटबॉल संघातून सहा तसेच क्रिकेट, जलतरण, वुशू,रग्बी आणि बास्केटबॉल संघातील एकूण 19 खेळाडू बदलण्यात आले असून त्यांच्या जागी नव्या दमाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

आयएसएलच्या सहा खेळाडूंची माघार

इंडियन सुपर लीगच्या सहा खेळाडूंना आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची परवानगी न दिल्यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले आहे. आयएसएलकडून परवानगी मागण्यात आली होती, पण त्यांनी नकार दर्शविल्यामुळे क्लब विरुद्ध देश असा वादही रंगला होता. हे सहा खेळाडू पुरुष आणि महिला संघाचे आहेत. बीसीसीआयने महिला संघात वेगवान गोलंदाज अंजली सरवानीची निवड केली होती, मात्र तिला झालेल्या दुखापतीमुळे संघात अनुभवी गोलंदाज पूजा वस्त्रकारची निवड करण्यात आली आहे.

ओडिशाच्या खेळाडूंना दहा लाखांचे अर्थसहाय्य

हिंदुस्थानातील पहिल्या क्रमांकाचे क्रीडाप्रेमी राज्य असलेल्या ओडिशा सरकारने आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळणाऱ्या राज्यातील खेळाडूंना दहा लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या क्रीडा महोत्सवासाठी प्रशिक्षण आणि सहभागासाठी राज्य शासनाने मदत केली आहे. यंदाच्या या स्पर्धेत ओडिशातील 13 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यात ऍथलीट किशोर जेना, नौकायनमध्ये अंशिका भारती, रितू आणि सोनाली स्वाइन, जू जित्सू प्रकारात अनुपमा स्वाइन, कयाकिंगमध्ये नेहा देवी, फुटबॉलमध्ये प्यारी जाक्सा, हॉकीत दीप ग्रेस इक्का आणि अमित रोहिदास तसेच रग्बीमध्ये डुमुनी मारंडी, तारुलता नायक, हुपी माझी यांचा समावेश आहे.

आधी निवड मग डच्चू

आधीपासून वादात अडकलेल्या अश्वारोहण क्रीडा प्रकारात आणखी एक वाद जन्माला आला आहे. अश्वारोहण महासंघाने आधी संघात राजू सिंग, तेजस ढिंगरा, किरत सिंह नागरा आणि यश यांची निवड केली होती. क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या कामगिरीवरून आणि पदक जिंकण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या नावाला मंजुरीही दिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी मान्यता नसलेल्या स्पर्धांत खेळून पात्रता मिळवल्याची त्यांची तक्रार करून त्याला वगळण्याची मागणी करण्यात आली. किरतला वगळल्यामुळे शोजपिंगच्या पूर्ण संघानेच स्पर्धेतून माघार घेण्याचे जाहीर केले होते. या प्रकारात किमान तीन खेळाडू लागतात. त्यामुळे काही अश्वारोहकांनी किरतला संघात घेण्याची ‘साई’कडे आग्रही मागणी केल्यामुळे त्याला संघात कायम ठेवण्यात आले आहे, मात्र राजू सिंहला काढले आहे.