
कोल्हापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने अखेर एशियन पेंट कंपनीला वादग्रस्त जाहिरात मागे घ्यावी लागली. तूर्तास युट्यूबवरून जाहिरातीचा व्हीडिओ या कंपनीने काढून टाकला आहे. एका दिवसात दहा हजारहून अधिक कोल्हापूरकरांनी या व्हीडिओला डिस्लाईक केले आहे.
रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरचा अवमान केल्याने आमदार ऋतुराज पाटील यांनी ही जाहिरात मागे घ्यावी तसेच कोल्हापूरची माफी मागावी अशी मागणी काल रात्री सोशल मीडियावर केली होती. तर आज ठिकठिकाणी एशियन पेंटच्या दुकानासमोर विविध संघटनांनी आंदोलने करुन निदर्शने केली होती. सिंगापूर आणि कोल्हापूर असा उल्लेख असलेल्या या जाहिरातीत कोल्हापूरला कमीपणा दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अखेर कंपनीने वाद न वाढवता युट्युबवरून याचा व्हिडीओ हटवला आहे.
काय आहे जाहिरात?
एशियन पेंटच्या जाहिरातीत सिंगापूर आणि कोल्हापूर अशी तुलना करण्यात आली आहे. जाहिरातीत घरात मुलं सिंगापूरला जाण्याची चर्चा करत असताना त्यांचे वडील येतात आणि आपण सिंगापूर नाही तर कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगतात. हे ऐकून मुलाचे मित्र त्याची हेटाळणी करतात. यामुळे कोल्हापूरकर संतप्त झाले.





























































