सहयोगी प्राध्यापकांची 100 पदे भरणार , पालिका रुग्णांलयातील रिक्त पदांचा प्रश्न सुटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुंबई महानगरपालिकेची मुख्य आणि सर्वसाधारण रुग्णालयांत रिक्त असलेली सहयोगी प्राध्यापकांची 100 पदे भरली जाणार असून त्यामुळे पालिका रुग्णालयांतील रिक्त पदांचा प्रश्न सुटणार आहे. आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रवीणा मोरजकर यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत टीचिंग आणि रुग्णांवरील उपचारांसाठी साहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक अशी 20 ते 25 विषयांवरील विविध पदे असतात. पालिका रुग्णालयांतील 3 मुख्य तसेच 16 सर्वसाधारण रुग्णालयांतील सहयोगी प्राध्यापकांची 105 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 100 पदे भरावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने पालिकेच्या आरोग्य समितीत सादर केला. हा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. ही पदे भरल्यास रुग्णसेवा अधिक गतिमान होणार आहे. सहयोगी प्राध्यापकांना सरासरी मासिक 1 लाख 82 हजार ते 2 लाख 24 हजार 100 इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.

‘ती’ व्हेंटिलेटर्स पालिका रुग्णालयांना देणार

मुंबई महापालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी राबवलेल्या विविध मोहिमांमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोना जम्बो आणि कोरोना केंद्रांमधील रुग्णसंख्याही कमी झाली असून या केंद्रांमधील व्हेंटिलेटर्सचा वापर सध्या होत नाही. ही व्हेंटिलेटर्स पालिका रुग्णालयांना देण्याबाबत विचार करत आहोत, अशी माहिती आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रवीणा मोरजकर यांनी दिली.