उल्हासनगरच्या सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, पाच जखमी

उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीमध्ये शनिवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला असून पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायट्रोजन गॅसचा कंटेनर सेंच्युरी कंपनीत आणण्यात आला होता. त्यात CS2 (कार्बन डाय सल्फर) फील करणार होते. त्याची चेकिंग सुरू असताना भीषण स्पोट झाला. या स्फोटामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारांसाठी सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांवर अतिदक्षता विभागात, तर दोघांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. एकाला फोर्टीज रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींची प्रकृती स्थिर आहे.

स्फोट झाला तेव्हा कंपनीमध्ये अनेक कामगार काम करत होते. हा स्फोट एवढा भीषण होता की तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी परिसरातील घरांना हादरे बसले. दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.

स्फोटानंतर घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिकांनीही धाव घेतल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पत्रकारांनीही घटनास्थळी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून उपसंचालक, आद्योगिक सुरक्षा हे घटनेची चौकशी करत आहेत.