कोवळ्या वयातच मुलांची मानसिकता बनतेय हिंसक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलांचाही सहभाग असल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पॉर्न साईट पाहून कोवळ्या वयातच मुलांची मानसिकता हिंसक आणि विकृत बनत असल्याचे स्पष्ट होत आहे.

पॉर्न फिल्मच्या आहारी गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाने आपल्या मोठ्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यामध्ये मुंबई परिसरात घडली होती. तसेच पुण्यातील कोंढवा परिसरात ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. लोणी परिसरात रस्त्यावर कुटुंबासमवेत झोपलेल्या एक वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर एका नराधमाने बलात्कार करून खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, १९ जून २०१२ रोजी बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) हा कायदा लागू करण्यात आला. तेव्हापासून २०१७ सालापर्यंत शिवाजीनगर न्यायालयात २०२७ बाललैंगिक अत्याचाराचे खटले दाखल झाले. यातील ६०९ खटले निकाली निघाले, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी दिली.
इंटरनेटच्या वाढत्या गैरवापरामुळे लहान मुले अशा गुन्ह्यांच्या गर्तेत अडकत आहेत. शाळकरी मुलांनादेखील पालक मोबाईल खरेदी करून देतात. या मोबाईल, संगणकांवर पॉर्न साईट सहज उपलब्ध आहेत. अनेक लहान मुले या साईट सर्रास पाहतात. लहान वयातच त्यांच्यामधील हार्मोन बदलत असून, त्यांची मानसिकता हिंसक, विकृत बनते. त्यामुळे त्यांच्या हातून असे गुन्हे घडत आहेत, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी दिली. पॉर्न साईटमुळे होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलामुळे त्यांच्या हातून नकळत गुन्हे घडतात. त्यामुळे त्यांना शाळेमध्येच सेक्स एज्युकेशनविषयी माहिती दिली गेली पाहिजे. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेऊन इंटरनेटचा वापर, कायदा याविषयी पालकांसह, लहान मुलांमध्ये जनजागृती केली पाहिजे, असेही अ‍ॅड. बोंबटकर म्हणाले.

पालकांचा हवा वॉच
पालकांनी मुलांना मोबाईल, संगणक देताना विशेष काळजी घेतली पाहिजे. विविध देशांमध्ये पॉर्न साईट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातदेखील अशा वेबसाईट्सवर बंदी घातली गेली पाहिजे. पालकांनी मुलांबरोबर मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधला पाहिजे. लहान मुलांना योग्य वयातच सेक्स एज्युकेशन दिल्यास अजाणत्या वयात त्यांच्या हातून होणाऱ्या बलात्कारासारख्या घटना रोखण्यास मदत होईल, असेही अ‍ॅड. बोंबटकर म्हणाले.