अटलजींची सभा झाली अन् मैदानाला ओळख मिळाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

1999 च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी अटलजींच्या सभेचा दौरा आला. सभा कोठे घ्यायची हा प्रश्न स्व. गोपीनाथराव मुंडे समोर उभा राहिला कारण सभेसाठी उसळणारी गर्दी डोळ्यासमोर उभी होती. बीडचे स्टेडियम अपुरे पडणार होते. अखेर नगर रोडवर असणाऱ्या मोकळ्या मैदानात सभा ठरली. लाखोंची गर्दी जमली. अटलजींच्या दमदार भाषणाने मैदान जिकले. त्यावेळी पहिल्यांदा अटलजीचे पाय बीड जिल्ह्याला लागले होते. त्यांच्या सभेने भाजप उमेदवाराचा विजय निश्चित होता.

स्व. प्रमोद महाजन आणि स्व गोपीनाथराव मुंडे यांची कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याविषयी त्यांच्या मनात आत्मियता होती. बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगाराबद्दल मोठी सहानभूती होती, ऊस तोड कामगारांचा जिल्हा ही बीडची ओळख पुसण्यासाठी काही तरी झाले पाहिजे असे त्यांनी आपल्या भाषणातही म्हंटले होते. ज्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते आले त्यांचा विजयी झाला आणि अटलजींची ज्या मोकळ्या मैदानावर सभा झाली त्या मैदानाला जनतेनेच ‘अटलजी मैदान’ असे नाव पाडले. आजही हे मैदान अटलजी मैदान म्हणूनच ओळखले जाते. काळाच्या ओघात या मैदानावर आता लोकवस्ती झाली असली तरी ओळख मात्र कायम राहिली.