
सामना ऑनलाईन, पुणे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले आणि जनसंघाच्या तालमीत तयार झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेजी यांचा पुणे महापालिकेने २३ जानेवारी १९८७ साली मानपत्र देउन गौरव केला. त्यावेळी वक्ता दशसहस्त्रेषु असलेल्या वाजपेजी यांचे भाषण पालिकेच्या सभागृहाने अनुभवले. तडाखेबंद भाषणात तत्कालीन राजकीय आणि सामाजिक स्थितीवर वाजपेजी यांनी परखडपणे भाष्य केले होते.
पुणे महापालिका विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा मानपत्र देउन सत्कार करते. अटलबिहारी वाजपेजी यांना उल्हास बा. ढोले पाटील हे महापौर असताना मानपत्र देण्यात आले. त्यावेळी प्रा. शंकरराव खरात, प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी वाजपेजी खासदार होते. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला. पालिकेने दिलेल्या मानपत्रात देशव्रत अटलजी, संसदपटू, झुंजार अटलजी, विदेशमंत्री अटलजी, कविराज व महान वक्ते अटलजी याचा उल्लेख करण्यात आला होता. अटलजी आपल्या वक्तृत्वाबद्दल काय लिहावे? वाजपेजी म्हणजे ‘लाखांची सभा ’हे समीकरण राजकीय क्षेत्रात आपण निर्माण केले आहे. अंधारात प्रकाश निर्माण करण्याचे, पिचलेल्या मनाला संजीवनी देण्याचे, दगडाला जाग आणण्याचे सामर्थ्य आपल्या वक्तृत्वात आहे, असे या मानपत्रात नमूद करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मतांवर लक्ष ठेवून त्यांचा संबंध देशातील प्रत्येक समस्येशी लावल्याने गुंतांगत वाढली आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रश्न सोडविले पाहिजे. मतभेद असावेत. पण मनभेद असता कामा नयेत. राजकारण हे सेवेचे साधन आहे. सत्ता ही सेवेसाठी आहे. तर विरोध हाही सेवा सुधारण्यासाठी आहे. राजकारणी व्यक्तीचा सत्कार करण्यापेक्षा कलाकार, साहित्यक, रचनात्मक कार्य करणाऱ्यांचा सत्कार व्हावा असे मत अटल बिहारी वाजपेजी यांनी व्यक्त केले होते. त्यावेळी वक्ता दशसहस्त्रेषु वाजपेजीचे भाषण पालिकेच्या सभागृहाने अनुभवले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयाचे वाजपेजी यांच्या हस्ते अनावरण
डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळयाचे अनावरण अटलबिहारी वाजपेजी यांच्या हस्ते झाले. तसेच पुणे महापालिकेच्या इमारतीच्या भीतीवर असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र अटलबिहारी वाजपेजी यांच्या हस्ते तत्कॉलीन महापौर भाउसाहेब खिलारे यांनी १७ जानेवारी १९९१ रोजी स्विकारले होते.
वैकुंठ स्मशानभुमीला दुसरा दरवाजा तयार केला…
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक रज्जुभैय्या यांचे २००३ साली जुलै महिन्यात पुण्यात निधन झाले. त्यावेळी अटलबिहारी वाजपेजी पंतप्रधान होते. रज्जुभैय्या यांच्या अत्यंविधीला वाजपेजी पुण्यात आले होते. यावेळी वैकुंठ स्मशानभुमीला एकच दरवाजा होता. पण पंतप्रधान येथे येणार असल्यामुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून दोन दरवाजे असणे आवश्यक होते. त्यामुळे वैंकुठ स्मशानभुमीला दुसरा दरवाजा तयार करण्यात आला, अशी आठवण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्त श्रीधरपंत फडके यांनी सांगितली.
पोहे, पुरणपोळी आवडे पदार्थ
पुण्यात आल्यावर अटलबिहारी वाजपेयी बहुतेक वेळा आपटे रस्त्यावरील हॉटेल श्रेयसमध्ये उतरत होते. पुणेरी पद्धतीचे पोहे आणि पुरणपोळीही त्यांना आवडत होती असे श्रेयस हॉटलचे दत्तात्रेय चितळे यांनी सांगितले.


























































