
सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे तब्बल 51 वर्षानंतर नगरच्या श्रीरामपूर मधील आठवणीला उजाळा मिळाला. वाजपेयी यांची शहरातील नवीन मराठी शाळेत जनसंघाच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित केलेली होती. त्यावेळी विद्यार्थीदशेत असलेल्या डॉ. रमेश बडजाते (60) यांना शाळेत दीडशे रुपयाचे बक्षीस मिळाले होते. ही रक्कम बडजाते यांनी भर सभेत वाजपेयी यांना जनसंघाला पक्षनिधी म्हणून दिली. मात्र वाजपेयी यांनी ही रक्कम पुन्हा बडजाते यांच्या खिशात घातली व त्यांचा सत्कार केला. ” तू वर्षभर अभ्यास करुन यश मिळविले. ही रक्कम तू तुझ्यासाठी वापर”, असे बडजाते याना वाजपेयी म्हणाले. यावेळी वाजपेयी यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. शाळेचे मैदानही सभेसाठी अपुरले पडले होते अशी आठवण बडजाते सांगतात.


























































