
हिमालयातील पीरपंजाल डोंगररांगेत हिमाचलच्या रोहतांगमध्ये दहा हजार फूट उंचीवर बनवण्यात आलेल्या जगातील सर्वात लांब ‘अटल टनेल’ सुरू झाला. या बोगद्यामुळे मनाली ते लेह हे अंतर चार तासांनी कमी झाल्याने लष्कराला कोणत्याही वेळेत चीन सीमेपर्यंत धडक मारता येऊ शकते. तसेच कोणत्याही ऋतुमध्ये तातडीने रसद पुरवता येऊ शकते. इतकेच नव्हे या बोगद्यामुळे बर्फवृष्टीसारख्या संकटातही लडाखचा देशाच्या अन्य भागाशी संपर्क तुटणार नाही.
मागच्या सरकारांनी सुरक्षेशी समझोता केला; पंतप्रधान मोदी यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील मनाली-लेह या मार्गावरील जवळपास 10 किलोमीटर लांबीच्या या ‘अटल टनेल’चे लोकार्पण केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने या बोगद्याला ‘अटल टनेल’ हे नाव देण्यात आले आहे. रोहतांग येथे हिमालयाच्या अजस्त्र डोंगररांगा पोखरून 9.2 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी दहा वर्षांचा काळ लागला. हा जगातील सर्वात लांब बोगदा असून 2010 मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते या बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या बोगद्यासाठी जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या बोगद्याच्या लोकार्पणप्रसंगी बोलताना मोदी यांनी मागच्या सरकारांनी देशाच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, उलट सुरक्षेशी समझोता केला असा आरोप केला.
टनेलची वैशिष्ट्ये
14 हजार 508 मेट्रिक टन स्टीलचा वापर
बांधकामासाठी लागले अडीच लाख मेट्रिक टन सिमेंट
14 लाख घनमीटर डोंगर व खडकाचे खोदकाम करण्यात आले
दर 60 मीटरवर अग्नीरोधक यंत्रणा
दर अर्धा किलोमीटरवर बाहेर पडण्यासाठी रस्ता
प्रत्येक किलोमीटरवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार
दर अडीचशे मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे
बोगद्यातून जाताना सपाट रस्त्यावरून जात असल्यासारखे वाटेल परंतु बोगद्याच्या एका भागात आणि दुसऱ्या भागात 60 मीटर उंचीचा फरक आहे.

























































