
कंटेट क्रिएटर अथर्व सुदामे याने गणेशोत्सवातील सर्वधर्म समभाव दाखवणारी रील शेअर केल्यामुळे वाद उद्भवला आहे. ब्राह्मण महासंघाचा विरोध व काही संघटनांच्या धमक्यांनंतर त्याने ही पोस्ट डिलिट केली असली तरी कलाकार व मान्यवरांनी त्याला पाठिंबा दिला आहे.
‘मूर्ती एक, भाव अनंत’ अशा शीर्षकाची एक रील अथर्वने तयार केली होती. त्यात एका मुस्लिम मूर्तिकाराकडून गणपतीची मूर्ती विकत घेण्याचा प्रसंग चित्रित करण्यात आला होता. त्याला काहींनी आक्षेप घेतला. त्यानंतर अथर्वने ही पोस्ट डिलिट करून माफी मागितली. त्यानंतर यावरून वाद सुरू झाला आहे. अनेक कलाकारांनी अथर्वला पाठिंबा दिला आहे.
ट्रोलर्सना मेंदू नसतो अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेत्री प्राजक्ता हनमघर हिने दिली. अथर्वला धमक्या देणारे सुमार धर्मवादी आहेत, असे ऍड. असीम सरोदे म्हणाले. माफी मागितल्याबद्दल काही कलाकारांनी अथर्व सुदामे याला टॅग करून नाराजीही व्यक्त केली. ‘अथर्वने कणा ताठ ठेवायला हवा होता, असे निर्माता वरुण सुखराज म्हणाला.
अथर्व सुदामेनं भावना दुखावण्यासारखं काहीही केलं नव्हतं. कोणाला शिव्याशाप दिले नव्हते, उलट एकीची भावना निर्माण करणारी रील केली होती. त्याला कुणाची हरकत का असावी. – सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री






























































