देशातील 5 शहरात आत्मघाती हल्ला होणार, अतिया रिचार्जच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

सामना प्रतिनिधी । जळगाव

23 मे रोजीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी बुधवारी एका फेसबूक पोस्टवरुन जळगावात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. अतिया रिचार्ज नामक एका फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट आलेली असून त्यात स्वत:ला ‘जैश ए मोहम्मद’चा अतिरेकी असल्याचे सांगत पाकिस्तान जिंदाबादचा नारा लावला आहे. एवढेच नव्हे तर देशभरातील पाच शहरांमध्ये पुलवामापेक्षा भयंकर हल्ले करण्यात येणार असून भावी पंतप्रधानांनी सांभाळून राहण्याचा इशारा दिला आहे. या पोस्टमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून पोलीस ही पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेत आहे. ही पोस्ट टाकणारा संशयीत मध्यप्रदेशात पळून गेल्याचे सांगण्यात येत असून पोलीस युध्दपातळीवर त्याचा शोध घेत आहेत.

फेसबकुवरील अतिया रिचार्ज या अकाउंटवर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा असून, पोस्टमध्ये संशयिताने स्वतःचे नाव मोहम्मद कलीमद्दीन खान दिले आहे. तसेच तो स्वतःला ‘जैश ए मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा सदस्य म्हणवून घेत आहे. तसेच पोस्टमध्ये इसिसच्या चिन्हाशी साधम्र्य असलेला फोटोदेखील टाकला आहे. या प्रकरणी प्राथमिक तपासात ‘जळगाव कनेक्शन’ समोर आले असून, संशयित आरोपी मध्य प्रदेशात पळून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

fbmpost

दिल्ली, मुंबई यासारखी शहरे आधीपासूनच दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्टवर आहेत. अशा पाच मोठ्या शहरांमधील आत्मघाती हल्ल्यांची योजना मूर्त स्वरुपात साकार करण्यासाठी या शहरांमध्ये याआधीच आत्मघाती हल्लेखोर आणि दारुगोळा पोहोचला आहे. पुलवामा हल्ला हा केवळ एक नमुना होता. त्यापेक्षा भयानक हल्ले आता होतील, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

देशाच्या भावी पंतप्रधानांनी सांभाळून रहावे, पंतप्रधान कार्यालय किंवा हवाई दौऱ्यादरम्यान किंवा अन्यत्र कुठे काहीही होऊ शकते, असा इशारा पोस्टमध्ये देण्यात आला आहे. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केली जात होती. यात शरीक-ए-हयात इरशाद बेगम खान, मेरी जान, मेरा भाई मोहम्मद रहीमउद्दीन खान हे देखील माझ्यासोबत असल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे.