प्रार्थनेसाठी एकत्र जमलेल्या ख्रिस्ती समुदायावर अज्ञात टोळीचा  हल्ला

72

सामना प्रतिनिधी । चंदगड

चंदगडमध्ये देवाची प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमलेल्या ख्रिश्च्रन समुदायावर घरात घुसून अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यांत अकरा नागरिक जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना बेळगाव येथील के.एल.ई.रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

रविवारी सकाळी बाराच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोर काळे जॅकेट व तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकलवरून आले होते. प्रार्थनेसाठी जमलेल्या समुदायावर हॉकी स्टीक, तलवार, सळ्या, चॉपरने या हल्लेखोरांनी वार केले. परिस्थितीचे प्रसंगावधान साधत महिलांनी हल्लेखोरांवर चटणीची पुड फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे हल्लेखोर पसार झाले.

हल्लेखोर तळगुळी मार्गे कर्नाटक हद्दीत पसार झाले. पण या हल्लेखोरांनी रस्त्यात एक प्रवासी व टम्पो चालकावरही हल्ला केला. तळगुळी येथे त्यांनी टेम्पो चालकावर हल्ला केला. तर हिंडाल्को येथे प्रवाशाला वाटेत अडवून तलवारीचे वार केले. त्या दोघांनाही बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या