
नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या शिर्डी येथील कल्पदीप रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 10 ते 15 अज्ञात तरुणांनी रेस्टॉरंटमध्ये घुसून महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याला हॉटेलचे मालक वैभव दिलीप भाटीया (रा. शिर्डी) यांनी विरोध केल्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.
या तरुणांनी रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करून महिलांशी अश्लील भाषा वापरून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हॉटेल मालक भाटीया यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आम्हाला कशाला समजावतोस? असे म्हणत अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी काचेच्या वस्तू, टेबल-खुर्च्या फोडून रेस्टॉरंटमध्ये प्रचंड गोंधळ घातला. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, गंभीर जखमी झालेले हॉटेल मालक वैभव भाटीया यांच्यावर साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तात्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.