राममंदिर जमीन खरेदी घोटाळय़ाचा आरोप करणारे खासदार संजयसिंह यांच्या घरावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्टने 2 कोटींची जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. हा व्यवहार अवघ्या आठ मिनिटांत झाला. या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजयसिंह यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हा हल्ला भाजपने केला आहे. भाजपने कितीही गुंडगिरी केली तरी राममंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे.

‘आप’चे खासदार संजयसिंह आणि सपा नेते पवन पांडे यांनी दोन दिवसांपूर्वी लखनौत पत्रकार परिषद घेऊन श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर जमीन खरेदी घोटाळयाचा आरोप केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. संजयसिंह यांनी या संपूर्ण जमीन खरेदी व्यवहाराची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले आहेत.

राष्ट्रपती भवनापासून 100 मीटरवर घर

खासदार संजयसिंह यांच्या नवी दिल्लीतील घरावर हल्ला झाला. काळी शाई फेकण्यात आली. संजयसिंह यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन व्हिडीओ मेसेज केला आहे. ‘‘आपले निवासस्थन राष्ट्रपती भवनापासून 100 मीटरवर आहे. संजयसिंह को गोली मारो, अशा घोषणा देत माझ्या घरावर हल्ला केला. नेमप्लेटवर काळी शाई फेकली. असे संजयसिंह यांनी म्हटले आहे.

ट्रस्टने केंद्र सरकार, संघाला अहवाल पाठविला

घोटाळय़ाच्या आरोपानंतर श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने जमीन खरेदी व्यवहाराबाबतचा अहवाल केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाठविला असल्याचे वृत्त आहे. भ्रष्टाचाराचे आरोप म्हणजे विरोधकांचे कटकारस्थान असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. 2 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार काही मिनिटांतच 18.5 कोटींमध्ये कसा केला याबाबत अहवालात स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपने कितीही गुंडगिरी केली तरी राममंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. माझी हत्या झाली तरी बेहत्तर.
-खासदार संजय सिंह

 हा तर अधर्म

प्रभू श्रीरामांच्या नावाखाली दिलेला हा धोका म्हणजे अधर्म आहे, अशा शब्दांत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.