
सामना प्रतिनिधी । पुणे
टर्फ क्लब येथे सुरू असलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात असलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक गफुर पठाण यांना बाहेर बोलावून घेऊन त्यांना चौघांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. शहरात गुन्हेगारी वाढत असताना आता थेट नगरसेवकावरच भर रस्त्यात हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गफुर पठाण यांनी यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलाऊद्दीन कुरेशी, लॅकत खान, मोईद्दीन सैय्यद आणि आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक गफुर पठाण यांच्या भावाचे काही जणांसोबत आर्थिक व्यवहार होता. टर्फ क्लब येथे गफुर पठाण आणि त्यांचे कुटूंबीय साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. नऊच्या सुमारास एकाने त्यांना फोन करून शिवीगाळ व धमकी दिली. त्यांनतर पावणे बाराच्या सुमारास चौघेजण तेथे आले. त्यांनी कमरेला हत्यार लावून धमकी दिली. त्यानंतर चौघांनी पठाण यांना मारहाण केली आहे. यातील तिघांची नावे पठाण यांनी दिले असून, एकाचे नाव त्यांना माहिती नाही.
दरम्यान, नगरसेवक गफुर पठाण यांनीही साखरपुड्याच्या कार्यक्रमात असताना मला गेटवर बोलावून घेऊन मारहाण करण्यात आल्याचे सांगितले. सलाऊद्दीन कुरेशी, लियाकत खान, मोइद्दीन सैय्यदयासह आणखी एकाने मला विनाकारण मारहाण केली. आर्थिक वाद किंवा राजकीय वाद नसताना मला मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे.



























































