
संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अल धफरा भागातील अणूऊर्जा प्रकल्पाबाहेर ड्रोन हल्ले झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर एका जनरेटरला आग लागली आहे. या घटनेत कोणी जखमी झालेला नाही. तसेच प्रकल्पाची सुरक्षा आणि किरणोत्सर्गाच्या पातळीवर कोणताही परिणाम झालेला नाही. हा हल्ला इराणने केल्याचा दावा यूएईने केला आहे. दरम्यान, होर्मुझची समुद्रधुनी पार करुन 20 हजार टन एलजीपी घेऊन सिमी हे जहाज गुजरातच्या कांडला पोर्टवर दाखल झाले आहे.
यूएईतील अणूऊर्जा प्रकल्पाला इराण युद्धादरम्यान प्रथमच लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकल्पातून यूएईतील 25 टक्के वीजनिर्मिती होते. त्यामुळे यूएईसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. सुमारे 20 अब्ज डॉलर एवढा खर्च या प्रकल्पासाठी करण्यात आला आहे. इराण आणि अमेरिकेत सध्या युद्धबंदी असतानादेखील या प्रकल्पावर हल्ला करण्यात आला.




























































