
सामना ऑनलाईन शिकागो
मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी डेविड हेडलीवर अमेरिकेतील शिकागोच्या तुरुंगात जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तो जबर जखमी झाला असून त्याला नॉर्थ अवेस्टन इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ८ जुलै रोजी हेडलीवर दोन कैद्यांनी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.
डेविड हेडली हा अमेरिकचा नागरिक असून पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटना आयएसआय सोबत काम करत होता आणि २६/११ च्या हल्ल्यात त्याचाही समावेश होता.
८ जुलै रोजी दोन कैद्यांनी हेडलीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हेडली गंभीर जखमी झाला असून त्याला अवेस्टरन इस्पितळात दाखल केले आहे. इस्पितळात त्याला सीसीयू मध्ये ठेवण्यात आले असून पुढील २४ तास डॉक्टरांच्या निगरनाखाली असेल. ज्या दोन कैद्यांनी हेडलीवर हल्ला केला ते दोघे भाऊ आहेत. त्यांनी पोलिस कर्मचार्यावर हल्ला केल्याने त्यांना तुरुंगात डांबण्यात आले.
हेडली लष्कर ए तैयबासाठी अंडरकवर एजंट म्हणून करत होता. मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी त्याने भरपूर माहिती मिळवली होती आणि पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबा कडून प्रशिक्षणही घेतले होते. हल्ल्यापूर्वी त्याने
हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी रेकी केली होती. सप्टेंबर २००६ ते जुलै २००८ दरम्यान हेडली भारतात ५ वेळा आला होता. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे तिथले त्याने फोटो काढले आणि पाकिस्तानात जाऊन त्याने यावर हल्ल्याच्या मास्टरमाईंडशी चर्चा केली.
२४ जानेवारी २०१३ रोजी अमेरिकन कोर्टाने त्याला दोषी ठरवत ३५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
























































