हल्लेखोरांना झटपट शिक्षा झाली तरच पोलिसांवरील हल्ले थांबतील!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

पोलीस दल खूप अवघड परिस्थितीत काम करीत असते. त्यामुळे पोलिसांचा यथोचित सन्मान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे जरी असले तरी हल्ली पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिसांवरील हल्ले थांबविण्यासाठी हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांचा झटपट निकाल लावला पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा झाली तरच या प्रकाराला आळा बसेल, असे राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी सांगितले.

अरविंद इनामदार फाऊंडेशनच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पोलीस जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यावेळी बोलताना इनामदार यांनी पोलिसांची व्यथा मांडून पोलिसांनी कशाप्रकारे अवघड परिस्थितीत काम करावे लागते याबाबत सांगितले. म्हणून पोलिसांचे मनोधेर्य उंचावण्यासाठी, त्यांना बळ मिळण्यासाठी त्यांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि तोच आम्ही करीत असल्याचे ते म्हणाले.

फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा या वर्षीचा पोलीस जीवन गौरव पुरस्कार सेवानिवृत्त पोलीस महासंचालक वसंत सराफ, माजी एसीपी माधव प्रधान आणि निवृत उपनिरीक्षक श्यामराव राऊत यांना जाहीर झाला आहे. एक लाख 51 हजार, एक लाख 31 हजार आणि एक लाख 11 हजार रोख व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे इनामदार यांनी सांगितले. 26 डिसेंबर रोजी शिवाजी पार्प येथील स्वा. सावरकर सभागृहात सायंकाळी 6.00 वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यावेळी इन्फोसिसचे संस्थापक व मानद अध्यक्ष नारायण मूर्ती आणि रतन टाटा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.