
कानपूरमधील अत्तर व्यापारी पियूष जैन याला बेकायदेशीर मालमत्तेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरावर सुमारे सहा दिवस चाललेल्या छाप्यात बेसुमार स्थावर मालमत्ता सापडली. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने 22 डिसेंबरला त्याच्या घरावर छापा टाकला होता. जैनच्या घर आणि कार्यालयातून तब्बल 177.45 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पियूष जैनच्या घरातून 23 किलो सोनेही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सोन्यामध्ये विदेशी चिन्हे सापडली आहेत. त्यामुळे विदेशातून तस्करी होत असल्याचा संशयही बळावला आहे. त्यामुळे जप्त केलेल्या सोन्याच्या तपासाचे काम महसूल गुप्तचर संचालनालयाला देण्यात आले आहे. ते आता महत्त्वाचे मानले जात आहे. याशिवाय तळघरातून सुमारे 6 कोटी रुपये किमतीचे 600 किलोंहून अधिक चंदनाचे तेल जप्त केले आहे.
























































