
गोळीबार करत ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांचा डाव प्रसंगावधान राखत ग्राहकांनी उधळून लावला आहे. गणेशनगर परिसरात आज दुपारी ही थरारक घटना घडली. सुदैवाने घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. गोळीबारानंतर प्रसंगावधान दाखवत ग्राहकांनी दरोडेखोरांवर हल्ला चढवला असता भेदरलेल्या दरोडेखोरांनी पिस्तूल तिथेच टाकली आणि पळ काढला. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गणेशनगर परिसरात चतुर्भुज ज्वेलर्सचे दुकान असून आज दुपारच्या सुमारास दोन अनोळखी तरुण बाईकवरून तिथे आले. त्यांनी दुकानात घुसताच ज्वेलर्समालकावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर दुकानात एकच धावपळ उडाली. एक राऊंड फायर केल्यानंतर दरोडेखोरांनी दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र ती गोळी बंदुकीत अडकली. ही बाब लक्षात येताच दुकानातील महिला ग्राहकाने प्रसंगावधान राखत सळईच्या मदतीने त्या दरोडेखोरांवर हल्ला चढवला. यावेळी पकडले जाऊ या भीतीने दरोडेखोरांनी पिस्तूल तिथेच टाकली आणि काढता पाय घेत तेथून धूम ठोकली.
घटना सीसीटीव्हीत कैद
दरोड्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. त्यानुसार बोईसर पोलिसांनी दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती बोईसर पोलिसांनी दिली.




























































