
ई-मेल हॅक करून खासगी कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. बीकेसी येथे एक खासगी आयटी कंपनी आहे. त्या कंपनीत सायबर सिक्युरिटीचे काम चालते. तेथे विविध पदांवर अकराहून अधिक अधिकारी आहेत. त्या अधिकाऱयांना कार्यालयीन कामासाठी ई-मेल आयडी दिले आहे. त्या ई-मेलवरून महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण होते. नुकतेच कंपनीच्या काही अधिकाऱयांचा ई-मेल हॅक करत, त्यातील ऍक्सेस घेऊन कंपनीच्या 34 जणांना ई-मेल पाठवण्यात आले. त्या मेलवरून कंपनीची बदनामी करण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच कंपनीने बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. कंपनीने दिलेल्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.




























































