कांद्याचा लिलावात भाव वधारला; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त

गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळले होते. आता साठवून ठेवलेला गावरान कांदा बाजारात विक्रीसाठी अंतिम टप्प्यात आला आहे. घोडेगाव उपबाजार आवारात सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याला पहिल्यांदाच 2200ते 2222 रुपयांचा भाव मिळाला. उच्च प्रतीच्या एका वक्कल कांद्याला 2700 रुपये क्विंटलपर्यंत गेला. आता कांद्याचे भाव वाढत आसल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. साधारण बाजारात कांदा आवक प्रचंड घटल्याने दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्याला याचा फायदा झाला नाही. केंद्र सरकारच्या नाफेडद्वारे खरेदीच्या घोळामुळे शेतकऱ्यांना पूर्वी मातीमोल भावाने कांदा विकावा लागला.

घोडेगाव उप बाजार आवारात सोमवारी 325 वाहनातून जवळपास 56 हजार 700 गोण्यांची आवक झाली. मुकल लालपत्ती, गोल्टा या कांद्याला एक हजार आणि पंधराशे पासून बावीशेपर्यंत कांद्याचे दर निघाले. साठवणूकमध्ये ठेवलेला कांदा शेतकरी व साठवणूकदार यांनी विक्रीसाठी कांदा आणला आहे. कांद्याची मागणी हळूहळू वाढत असल्याने कांद्याचे दरही वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

लाल कांद्याची लागवड सुरू
पावसाने ओढ दिल्याने खरीप पिक वाया गेले आहे. हातचे आलेले पीक वाया जात असल्याने शेतकरी आता हवालदिल झाला असून रब्बी हंगामासाठी लाल कांद्याची लागवड काही प्रमाणात सुरू असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.