।।भारतमाता।। ऑगस्ट क्रांतिदिन

>>माधव डोळे<<

आज ऑगस्ट क्रांतिदिनआपला देश, मातृभूमी ही आपल्यासाठी देवताच असते. कसे आहे या भारतमातेचे स्वरूपआजच्या काळात आपल्याला काय करता येईल तिच्यासाठी

भारतमाता की जय… वंदे मातरम् असा जयघोष होताच करोडो देशभक्तांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. मातृभूमीला म्हणजेच हिंदुस्थानला माता मानण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यामागे प्रेरणा होती ती केवळ भारतमातेची. आपली भारतमाता इंग्रजांच्या बेडीतून सुटावी आणि ती स्वतंत्रपणे देशभक्तांच्या हृदयात विलसावी हाच त्यामागे उद्देश होता. केवळ हिंदूच नव्हे तर अनेक देशभक्त मुस्लिमही हिंदुस्थानला माता मानतात. लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा देणाऱया भारतमातेला देवीचे रूप देण्याची परंपरा ही पूर्वीपासूनची आहे. अध्यात्म शास्त्रात देवीला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मातृभूमीला माता मानणे हा विचार खूप जुना. ‘माता भूमिः पुत्रो।हं पृथ्विव्याः’ असा स्पष्ट उल्लेख अथर्व वेदातील बाराव्या कांडाच्या पहिल्या सूक्तात करण्यात आला. भूमी माता आहे व मी पृथ्वीचा पुत्र आहे असा त्याचा अर्थ.

मातृभूमी म्हणजेच भारतमाता. ही आमच्या प्राणाच्याही पलीकडे आहे, असा संदेश आतापर्यंत देण्यात आला. राष्ट्रालाच धर्म मानण्याची कल्पना हीदेखील आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वीची आहे. तक्षशिला विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केलेले आर्य चाणक्य यांना पहिले राष्ट्रगुरू मानले जाते. त्यानंतर थेट दुसरे राष्ट्रगुरू हे समर्थ रामदास स्वामी. त्यांनी तर या शब्दात आपले विचार मांडले-

धर्मासाठी मरावे । मरोन अवघ्यांस मारावे ।

मारिता मारिता घ्यावे । राज्य आपुले ।।

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लहान वयातच ‘शत्रूला मारता मारता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घरातील देव्हाऱयात असलेल्या देवीसमोर घेतली होती. असंख्य स्वातंत्र्ययोद्धय़ांप्रमाणेच भारतमाता स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा होती. ‘जननी जन्मभुमिश्च स्वर्गादपि गरियसी’ असे मातृभूमीचे त्यांनी वर्णन केले आहे. भारतमातेचे त्यांच्या इतके समर्पक वर्णन दुसरे कोणीही केले नाही. ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे..’ हे गीत कानावर पडताच प्रत्येक देशवासीयांच्या अंगावर राष्ट्रभक्तीचे रोमांच उभे राहतात. तू राष्ट्राची चैतन्यमूर्ती आहेस, अनेकांची प्रेरणास्थान आहेस असे वर्णन त्यांनी केले आहे.

सजग नागरिक म्हणून

> भारतमातेसाठी, तिच्या रक्षणासाठी, तिच्या भल्यासाठी देशातील प्रत्येकाने हातभार लावायला हवा. पण आपण सर्वसामान्य… आपण काय करू शकणार… असा विचार मनात न आणता प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला तर खूप काही होऊ शकते.

> रस्त्यावर कचरा, घाण पसरलेली असते. आपण स्वच्छता बाळगून रस्त्यावर कचरा टाकणारच नाही असे ठरवले तरी हा कचरा कुठेच दिसणार नाही.

> देशात जंगले असतील तर पाऊसपाणी चांगले होईल. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हे जरी मनापासून राबवले तरी आपल्या भारतमातेची सेवाच होऊ शकेल. देशासाठी हा विचार करून जंगलतोड थांबवली पाहिजे.

> भारतमाता म्हणजे आपला देश, तेथे राहणारे प्राणीमात्र… मुक्या जनावरांची देखभाल करून त्यांचे रक्षण केले तरी देशासाठी फार मोठी सेवा होऊ शकते.

> पर्यावरण चांगले राहील याकडेही आपण लक्ष ठेवू शकतो. देशात प्रदूषण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.

भारतमाता आहे तरी कशी?

करोडो देशवासीयांना पुजनीय असलेली ही भारतमाता आहे तरी कशी? असा प्रश्न अनेकांना पडतो. केशरी रंगाची साडी… हातात भगवा ध्वज आणि सिंहावर आरुढ झालेली तेजःपुंज अशी ही माता आहे. या भारतमातेला ‘भारतम्बा’ असेही म्हणतात. भारतमातेची वेगवेगळी रूपे असलेली चित्रे सध्या उपलब्ध आहेत. मात्र १९०५ मध्ये अवनीन्द्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा भारतमातेचे चित्र काढले. हिंदुस्थानातील भारतमातेचे पहिले मंदिर वाराणसी येथे उभारण्यात आले. हे मंदिर पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.