
कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यास खासगी दवाखान्यात टाळाटाळ होत असल्याने महापालिकेने आयएमए व इतर खासगी रुग्णालयाच्या सहकार्याने शहरात 10 ठिकाणी फिव्हर क्लीनिक सुरू केले आहेत. सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी या क्लिनिकची पाहणी केली.
ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे असलेल्या रुग्णांना तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयएमएच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. काही खासगी रुग्णालयांना देखील भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर बारा ठिकाणी फिव्हर क्लीनिक सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात आएमएतर्फे सहा, महापालिकेचे चार तर एमजीएम व धूत हॉस्पिटलमध्ये एक क्लिनिक असेल. सोमवारी 12 पैकी दहा क्लिनिक सुरू करण्यात आले. याठिकाणी सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील त्यांना क्विक केअर सेंटर मध्ये ठेवले जाणार आहे. क्विक केअर सेंटरसाठी समाज कल्याण विभागाच्या होस्टेलमध्ये 300 तर एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्स मध्ये शंभर खाटांची व्यवस्था झाली आहे. पदमपुरा येथील महापालिकेच्या सेंटरमध्ये साठ खाटांची, एमआयटी कॉलेजच्या होस्टेलमध्ये 150 बेडस् ची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण 610 बेडस् ची व्यवस्था या सर्व ठिकाणी आहे. तसेच क्विक केअर सेंटरमध्ये करोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याला डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये भरती केले जाणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात 220, एमजीएम मध्ये 300, धूत हॉस्पिटलमध्ये 200 आणि घाटी रुग्णालयात 250 बेड्सची व्यवस्था करण्यात आली असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
या ठिकाणी होणार तपासणी
समाज कल्याण हॉस्टेल किलेअर्क, एमजीएम स्पोर्टस कॉम्पलेक्स सिडको एन-6, अग्निशमन विभागाचे इमारत पदमपुरा, एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेल बीड बायपास, आयएमए मिनी हॉल समर्थनगर, आयएमए कम्युनिटी सेंटर आएमए, महापालिका शाळा गारखेडा, महापालिका शाळा भडकलगेट, महापालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स टीव्ही सेंटर चौक, महापालिका शाळा कांचनवाडी, एमजीएम कॉलेज ॲन्ड हॉस्पीटल, धूत हॉस्पिटल जालना रोड.




























































