
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यानुसार महापालिकेने तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयांत 736 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये 45 व्हेंटिलेटर आणि 437 ऑक्सिजनचे बेड असणार आहेत. त्यासोबतच एमजीएम आणि मेल्ट्रॉनमधील बाल कोविड सेंटरमध्ये मनपाचे डॉक्टर कार्यरत असणार आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. दररोज रुग्णसंख्या कमी निघत असून, बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे दुसरी लाट नियंत्रणात आणण्यास प्रशासनाला यश आले आहे. जुलै महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, या लाटेमध्ये बालकांना सर्वाधिक लागण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी तिसNया लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, कोरोना संसर्गाची तिसरी लाट रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. गरवारे कंपनीत शंभर खाटांचे बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासोबतच एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये शंभर खाटांचे बाल कोविड सेंटर तयार केले जात आहे. तसेच डेडिकेटेड कोविड केअर सेंटर 8 असून, त्यामध्ये 242 बेडची व्यवस्था असणार आहे. त्यातही व्हेंटिलेटर 6, एनआयसीयूचे 24, पीआयसीयू 20 व इतर 198 बेड राहतील. डेडिकेटेड कोविड सेंटर 9 असणार असून, त्यामध्ये 394 बेड राहणार असून, व्हेंटिलेटरचे 39, एनआयसीयू 49, पीआयसीयू 94, इतर 251 बेड राहतील. एकूण 18 रुग्णालयांत 736 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये व्हेंटिलेटरचे 45 बेड, एनआयसीयू 73 बेड, पीआयसीयू 114 बेड, इतर 549 बेडचा समावेश असणार आहे. डीसीएचसीमध्ये गरवारेसह सात खासगी रुग्णालये आणि डीएचसीमध्ये घाटी, एमजीएमसह सात खासगी रुग्णालयांत व्यवस्था असेल. यासंदर्भात मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय हे आदेश काढणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
मेल्ट्रॉनमध्ये बालकांसाठी 50 बेडची व्यवस्था
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मेल्ट्रॉनमध्ये 50 बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बेडला ऑक्सिजनची सुविधा असणार आहे. त्यासोबतच एमजीएम स्पोर्टस कॉम्प्लेक्समधील कोविड सेंटरसाठी मनपाचे डॉक्टर व कर्मचारी राहतील. गरवारे बाल कोविड सेंटरकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार असून, पिडियाट्रिक संघटनेने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासोबत बालकांवरील उपचारासाठी औषधी व इतर साहित्य खरेदी केले जाणार असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.





























































