
शेतातून कोबी काढण्याचे काम पूर्ण करून घरी परतणाऱ्या 9 तरुणांना पोहण्याचा मोह आवरता न आल्याने पोहण्यासाठी नाथनगरातील तलवात उतरलेल्या पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेमुळे सर्व हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या भालगाव येथील 9 तरुण शेतात कोबी काढण्यासाठी गेले होते. कोबी काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर घरी परतत असताना रस्त्यामध्ये असलेल्या नाथतलावातील पाणी पाहून काही तरुणांनी पोहण्याचा हट्ट धरला. त्यातील पाच जण समीर मुबारक शेख, शेख अन्सार शेख सत्तार, तालबी युसुफ शेख, अतीक युसूफ शेख, सोहेल युसुफ शेख, पोहण्यासाठी तलावत उतरले. तलावातील पाण्याचा व गाळाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत असल्याचा अंदाज काठावर बसलेल्या 4 तरुणांना आला. त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत ते बुडाले होते. त्यानंतर एक ते दीड तासानंतर ते पाण्यावर फुगून वर आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक महेश आंधळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. अशी माहिती पोलीस निरिक्षक महेश आंधळे यांनी दिली.




























































