ढगफुटीमुळे संभाजीनगरात अतिवृष्टी! नारेगाव, चिकलठाण्याला फटका; सुखना नदीला पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगरात पावसाचा कहर थांबायचे नाव घेण्यास तयार नाही. आतापर्यंत तीनवेळा ढगफुटीच्या वेगात कोसळलेल्या पावसाने संभाजीनगरला झोडपून काढले. शनिवारी पहाटे 25 मिनिटांत 118 मिली प्रतितास वेगाने 51 मिमी पाऊस झाला तर पहाटे साडेतीन ते साडेपाच या दोन तासात 78 मिमी इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

या पावसाचा सर्वाधिक फटका नारेगाव, चिकलठाणा, मसनतपूर, ब्रीजवाडीला बसला. या भागात पाणीच पाणी झाले. सुखना नदीला पूर आला. चिकलठाणा स्मशानभूमीची भिंत कोसळली, नूर कॉलनी, हिमायत बाग, असेफिया कॉलनी, कटकटगेट तसेच उल्कानगरी, पुंडलीकनगर, विश्रांतीनगर, सादातनगर, गारखेडा, समर्थनगर, कबाडीपूरा या भागातील घरासह तळमजल्यात पाणी शिरले. अनेक भागाचा वीजपुरवठा खंडीत झाला.

परतीच्या पावसाला सुरुवात

सोमवारपासून देशात राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. या चक्रिवादळाचा प्रवास नंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रिवादळाचे नामकरण शाहीन करण्यात आले.

1 ऑक्टोबर रोजी दिवसभर शहरावर आकाश निरभ्र राहिल्याने आर्द्रता घटल्याने कमाल तापमानान सुमारे दोन अंशाची वाढ नोंदवली गेली. शाहीन चक्रिवादळाने निर्माण केलेली वातावरण निर्मीती, परतीचा पाऊस व संभाजीनगर शहरावरील वातावरण बदलाचा एकत्रीत परिणाम आज पहाटे शहरावर झालेल्या जोरदार पावसावर दिसून आला.

यामुळे 2 ऑक्टोबर 2021 पहाटे 03:25 वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. यानंतर 03:38 दरम्यान मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली पहाटे 3:38 ते 04:03 या पंचवीस मिनिटात विजांचा कडकडाटासह सरासरी 118 मिली मिटर प्रतितास या ढगफुटीच्या वेगाने पाऊस पडला.

शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत या पंचवीस मिनीटात 51.2 मिमी पावसाची नोंद झाली. नंतर पावसाचा जोर कमी झाला. पहाटे 05:35 या दोन तासात शहरावर 78.2 मिमी पावसाची नोंद झाली. या वर्षी प्रथमच संभाजीनगर शहरावर गेल्या एका महिन्यात तीन वेळेस ढगफुटीच्या वेगाने पावसाने हजेरी लावली आहे.
– श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र व क्लब, संभाजीनगर