मेल्ट्रॉनमधील ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा, डीपीसीतून एक कोटीच्या निधीला मंजुरी

मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वीस केएलचा लिक्वीड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी एक कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे वंâत्राटदारास कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. कोरोनामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यामुळे रुग्णांना तातडीने ऑक्सिजन द्यावा लागतो. मेल्ट्रॉनच्या कोविड सेंटरमध्ये 258 बेड असून, सध्या 128 रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमधील सर्व बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा पुरविण्यासाठी या ठिकाणी 20 केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हा प्लांट उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डीपीसीतून एक कोटीचा निधी देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मनपाने ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. वीस केएल क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी सागर एजन्सीची निविदा अंतिम केली. परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी यासंबंधी चर्चा करून निधी देण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने डीपीसीतून एक कोटीच्या निधीला मंजुरी देत असल्याचे पत्र मनपाला पाठवले आहे. या पत्रामुळे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आता कंत्राटदार एजन्सीला ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या