खिडकीतून डोके बाहेर काढले अन् गेटच्या खांबाला धडकले, डोक्याचा चेंदामेंदा होऊन मुलाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मार्ट सिटी बसच्या खिडकीतून डोकावणाऱ्या शाळाकरी मुलाचे डोके गेटच्या खांबाला धडकले. या अपघातात मुलाच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास संभाजीनगरमधील संभाजीपेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानाजवळ घडली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने विद्यार्थ्याच्या सिटवर आणि बसमध्ये रक्ताचा सडाच पडला होता. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

हरिओम राधाकृष्ण पंडित (वय – 14) असे मुलाचे नाव असून सरस्वती भूवन शाळेत नववीच्या वर्गात तो शिकत होता. हा विद्यार्थी बजाज नगरातील मोहटादेवी मंदिराजवळ राहत होता.

सोमवारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे तो घरी जाण्यासाठी स्मार्ट सिटी बस (क्रमांक. एम एच 20 ई जी 9862)मध्ये सर्वात शेवटी आपतकालीन दरवाजाजवळच्या खिडकीच्या सिटवर जाऊन बसला. बस भरल्याने निघण्याची वेळ होताच बस चालकाने बस सुरू केली. बस जिल्हा परिषदेच्या गेटमधून बाहेर येत असतानाच मुलाने खिडकीतून डोकावून पाहिले. काही लक्षात यायच्या आतच मुलाचे डोके जिल्हा परिषदेच्या गेटच्या लोखंडी पोलला धडकले. त्याच्या डोक्याचा जागीच चेंदामेंदा झाला. गेटखाली आणि बसमध्ये त्याच्या रक्ताचा सडा पडला.

अपघात घडताच चालकाने बस थांबवण्याऐवजी बस चालवतच स्टॉपपर्यंत नेली. लोकांनी आरडाओरड केल्याने स्टॉपवर बस थांबवली. अपघातात मित्राचे डोके फुटलेले पाहून बसमधील विद्यार्थ्यांनी हंबरडाच फोडला. घटनेची माहिती शाळेतही कळवण्यात आली. शिक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलाला तातडीने बसचालक आणि प्रवाशांनी रिक्षात घालून घाटीत नेले. शिक्षकही पाठोपाठ घाटीत पोहोचले. तेथे तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अत्यंत दुर्दैवी घटना, तातडीने मदत करणार – प्रशासक डॉ. चौधरी

महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सिईओ डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या मैदानाजवळ विद्यार्थ्याचा अपघात झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे घरी जाऊन सांत्वन करणार असून स्मार्ट सिटीच्या रिलीफ फंडातून तातडीने जी शक्य आहे ती मदत करण्यात येईल. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून चालक-वाहकांना काळजी घेण्याची सूचना केली जाईल.

कंत्राटी चालकास सेवेतून काढले

स्मार्ट सिटीबससाठी साई एजन्सीमार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेला कपील अशोक लोखंडे यास चालकपदावरून तातडीने काढण्यात आले असल्याचे स्मार्ट सिटीबसचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर यांनी सांगितले.