संभाजीनगरात सर्व्हेक्षण पथकाला हुसकावून लावले, बायजीपूरा, नारेगाव, मोमिनपू-यात नागरिकांचा विरोध

1192

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरात शिक्षकांमार्फत सर्व्हेक्षण सुरू केले आहे. मात्र हे एनआरसी, एनपीआरचे सर्व्हेक्षण असल्याच्या गैरसमजातून नागरिक विरोध करत असून, आज गुरुवारी दोन ठिकाणाहून पथकाला हुसकावून लावण्यात आले. देशभर लॉकडाऊन असताना हे कर्मचारी फिरतात कसे? असा प्रश्‍न यावेळी नागरिकांनी केला.

शहरातील एका प्राध्यापक महिलेला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेसह संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. व्हायरसचा प्रादूर्भाव वाढलाच तर आवश्‍यक अलगीकरण, विलगीकरण कक्ष, कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करून ठेवण्यात आले आहेत. यासोबतच बाहेरगाहुन शहरात आलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी कमी असल्याने त्यांच्या सोबत शिक्षक देण्यात आले आहेत. बुधवारपासून शिक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्व्हेक्षणाचे काम करत आहेत. मात्र बुधवारी दुपारी मोमीनपुरा भागात नागरिकांनी या पथकाला हुसकावून लावले. देशभर लॉकडाऊन असताना तुम्ही महापालिकेचे कर्मचारी म्हणून फिरता कशाला? असा जाब विचारत, पोलिसांना सोबत घेऊनच या असे म्हणत तरुणांनी त्यांना हुसकावून लावले. त्यानंतर नारेगाव भागात देखील अशाच प्रकारे विरोध करण्यात आला.

गुरुवारी इंदिरानगर बायजीपुरा, हर्सूल भागातील नागरिकांनी पथकाला गल्लीत येण्यास मज्जाव केला. त्यामुळे पथकातील महिला शिक्षिकांनी ही बाब शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या कानावर टाकली. दुपारनंतर काम पुन्हा सुरू झाल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला.

नागरिकांची समजूत काढणार
आरोग्य केंद्र निहाय्य आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सर्व्हेक्षणास विरोध होत असल्याच्या तक्रारी बुधवारी, गुरुवारी आल्या. त्यानुसार आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब टाकण्यात आली आहे. एनआरसी किंवा एनपीआरचे हे सर्व्हेक्षण असावे, म्हणून नागरिकांचा विरोध होत असेल. त्यामुळे नागरिकांची समजूत काढूनच कामे करण्याची सूचना करण्यात आली असल्याचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले.

सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षकांना संरक्षण द्या
जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरससंदर्भात सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षकांसोबत नागरिक हुज्जत घालत आहेत, त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक सेनेतर्फे करण्यात आली आहे. महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निवेदनात देवेंद्र सोळंके यांनी नमूद केले आहे की, कोरोना संदर्भात सर्व्हेक्षण करणाऱ्या शिक्षकांना नारेगाव, हर्सूल या भागात अर्वाच्य भाषा वापरून हुज्जत घालत पिटाळून लावण्यात आल्याची घटना घडली. त्यामुळे शिक्षकांना कोरोना संरक्षण कीट व पोलीस संरक्षण देण्यात यावे, अन्यथा शिक्षकांच्या जीवितास, आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील.

आपली प्रतिक्रिया द्या