औसा तालुक्यातील रिंगणी येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औसा तालुक्यातील मौजे रिंगणी येथील जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडले आहे. शाळा सुरु करावी अन्यथा विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहे. मागील तीन वर्षांपासून पटसंख्या कमी झाल्यामुळे प्रशासनाने शाळा बंद केली आहे. सध्या या शाळेत 16 मुले शिक्षण घेत आहेत. यावर्षी 16 ऑगस्ट पासून शाळेला कुलूप लागलेले आहे. या विद्याथ्र्यांना गुळखेडा येथील शाळेत पाठवा असे म्हटले जात आहे. रिंगणी ते गुळखेडा या दोन गावामध्ये मोठा नाला आहे. तेथे रस्ता उपलब्ध नाही. लहान मुलांना पायी शाळेत जाणे शक्य नाही. त्यामुळे मागील दोन महिण्यांपासून ही मुले घरीच आहेत. मुलांच्या शाळेची व्यवस्था करावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.