
कसोटी क्रिकेट विश्वातील दोन बलाढय़ संघ अर्थातच गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि प्रथमच अंतिम फेरी गाठणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी (डब्ल्यूटीसी) एकमेकांविरुद्ध बुधवारपासून भिडणार आहेत. जागतिक क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटचा खरा डॉन कोण याचा फैसला करण्यासाठी उभय संघ सज्ज असले तरी ऑस्ट्रेलिया कसोटी जगज्जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे तर दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. जगज्जेतेपदाच्या या लढतीत जोरदार द्वंद्वाची अपेक्षा आहे, पण ऑस्ट्रेलियाच, डॉन को हराना मुश्किलही नहीं, नामुमकीन है, हे लॉर्ड्सवर दाखवण्यासाठी आपल्या तगडय़ा संघासह सज्ज झाला आहेत.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजीही जबरदस्त
ऑस्ट्रेलियन संघात स्टीव्हन स्मिथ हा सर्वात अनुभवी फलंदाज आहे, ज्याच्या नावावर 10,271 धावांची नोंद आहे. तसेच संघात ट्रव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन हे अस्सल फॉर्मात असलेले फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एकूण संघाची धावसंख्या 33,376 आहे तर दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या नावावर केवळ 12,719 धावा आहेत. कर्णधार टेम्बा बवुमा (3606) हा दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियन संघात 1593 विकेट घेणारे गोलंदाज
एकेकाळी हिंदुस्थानी संघात फलंदाजीतले दिग्गज होते. तसेच आता ऑस्ट्रेलियन संघात गोलंदाजीतले दिग्गज आहेत. त्यांचा एकमेव असा संघ आहे, ज्यात महत्त्वाच्या चारही गोलंदाजांनी 250 पेक्षा अधिक विकेट टिपल्या आहेत. कर्णधार पॅट कमिन्स (294 विकेट), जॉश हेझलवूड (279), नॅथन लायन (553) आणि मिचेल स्टार्क (382) यांनी तब्बल 1508 विकेट टिपल्या आहेत. ऑस्ट्रेलियाइतका भेदक आणि भन्नाट संघ कोणताच नाही. याउलट आफ्रिकेकडे केवळ पॅगिसो रबाडा आहे, ज्याच्या खात्यात 327 विकेट आहेत. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियन गोलंदाजी म्हणजे ‘राजा भोज’ आणि आफ्रिकन गोलंदाजी ‘गंगू तेली’च्या रूपात आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या खात्यात 1593 विकेट आहे तर आफ्रिकन गोलंदाजांनी जेमतेम 687 विकेट टिपलेत.
ऑस्ट्रेलियाच क्रिकेटचा डॉन
आयसीसीची सर्वाधिक जेतेपदे ऑस्ट्रेलियाने जिंकलीत. पुरुष, महिला आणि युवा या तिन्ही गटाची जेतेपदे त्यांच्याकडे आहेत, एवढेच नव्हे तर कसोटीचे जगज्जेतेपद जिंकून त्यांनी आयसीसीच्या जगज्जेतेपदाची चौकटही गेल्यावेळी पूर्ण केली होती. सध्या ते वन डे क्रिकेटचे जगज्जेते आहेत आणि कसोटी क्रिकेटचेही जगज्जेतेपद राखण्यासाठी ते उतरणार आहे. आयसीसी स्पर्धांच्या इतिहासात कसोटीचे जगज्जेतेपद कुणीच राखलेले नाही आणि जे कुणी केले नाही, तेच ऑस्ट्रेलिया करून दाखवते. सलग तीनदा वन डे वर्ल्ड कप जिंकणारा ऑस्ट्रेलिया जर दक्षिण आफ्रिकेला धूळ चारतो तर तो जगज्जेतेपद राखण्याचा नवा इतिहास रचेल.
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघातील नऊ खेळाडू कायम
ऑस्ट्रेलियन संघ किती स्थिर आहे, याचे उदाहरण अंतिम 11 जणांचा संघ पाहिल्यावर कळून येते. गेल्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम लढतीत खेळलेल्या 11 खेळाडूंपैकी केवळ सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि गोलंदाज स्कॉट बोलॅण्ड हे दोन खेळाडूच अंतिम संघात नाहीत. या दोन खेळाडूंच्या जागी ब्यू वेबस्टर आणि जॉश हेझलवूड खेळत आहेत. उर्वरित नऊ खेळाडू गेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानविरुद्ध खेळले होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाला 209 धावांचा मोठा विजय मिळवून दिला होता. आताही त्याच पुनरावृत्तीसाठी त्यांनी चेंडू हातात घेतला आहे. जगातील चार यशस्वी गोलंदाज आणि त्यांच्या जोडीला जगातील आघाडीचे चार फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा सहज पाडाव करतील, याबाबत कुणाचेही दुमत नाही.
ऑस्ट्रेलियासमोर आफ्रिकन संघ दुबळाच
दक्षिण आफ्रिकन संघाने डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत सलग सात विजय नोंदवत धडक मारली असली तरी त्यांचे हे विजय कमकुवत संघाविरुद्धचे आहेत. त्यामुळे या सलग सात विजयांचा ऑस्ट्रेलियन संघावर कसलाही फरक पडण्याची शक्यता कमीच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकन कुठेच टिकत नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी ही सध्या जगातील सर्वात धारदार आणि भेदक आहे, तर फलंदाजीतही त्यांच्या खेळाडूंना कुणीच मागे टाकू शकत नाहीत. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघात पॅगिसो रबाडा हाच एकमेव अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. मात्र माकाx यान्सनच्या गोलंदाजीने सर्वच फलंदाजांच्या तोंडाला चांगला फेस आणला आहे. तसेच केशव महाराजची फिरकीही लॉर्ड्सवर काय कमाल करते यावर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान अवलंबून असेल.
दक्षिण आफ्रिकेला जगज्जेतेपदाची चव चाखायचीय…
क्रिकेट इतिहासातील सर्वात दुर्दैवी संघ म्हणून दक्षिण आफ्रिकन संघाची नोंद केली जाते. हा संघ आजवर एकदाही जगज्जेता ठरू शकलेला नाही. विशेष म्हणजे त्यांचा संघ नेहमीच उपांत्य फेरीतच दम सोडतो. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत त्यांनी धडक मारून आपली उपांत्य फेरीत हरण्याची परंपरा मोडीत काढली होती. मात्र ते अत्यंत थरारक सामन्यात हिंदुस्थानविरुद्ध हरले. आताही ते प्रथमच डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचलेत. त्यांच्यासमोर केवळ जगज्जेतेपदाचेच ध्येय आहे. त्यांना ऑस्ट्रेलियाला हरवून आपल्या पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाचे चुंबन घ्यायचेय. जे आजवर कधीही घडले नाही, ते त्यांना लॉर्ड्सवर घडवायचेय. नवा इतिहास रचायचा आहे. ते यात कितपत यशस्वी होतात, ते कसोटीचे पहिले दोन दिवसच सांगतील.
ऑस्ट्रेलियाच जगज्जेते होणार
कसोटीचे अजिंक्यपद कोण जिंकणार, हे अनिश्चित असले तरी क्रिकेटचे दिग्गज आपापले अंदाज बांधू लागले आहेत. सर्वांच्या मुखात एकच नाव आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. दोन वर्षांपूर्वी इंग्लिश वातावरणातच ऑस्ट्रेलियाने आपले पहिले डब्ल्यूटीसी जेतेपद पटकावले होते. त्यापूर्वी त्यांनी इंग्लंडमध्येच ‘अॅशेस’ जिंकून आपला दबदबा दाखवला होता. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी जबरदस्त होत असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा निभाव लागणे कठीणच वाटतेय. त्यामुळे इंग्लंड असो किंवा हिंदुस्थान. साऱ्याच दिग्गजांची पहिली पसंती ऑस्ट्रेलियाच आहे. आता दक्षिण आफ्रिका साऱ्यांचे अंदाज चुकवते की खरे करते, ते कळेलच.
ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, पॅमरून ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेझलवूड.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम संघ
टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, रायन रिकल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्ज, डेव्हिड बेडिंगहम, कायल वेरेन, मार्को यान्सन, केशव महाराज, पॅगिसो रबाडा, लुंगी एनगिडी.