काळ्या फिती बांधून ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मैदानात उतरले, कारण माहिती आहे का ?

1225
australian team black armbands

ऑस्ट्रेलियात भीषण वणवा पेटला असून यामध्ये प्रचंड हानी झाली आहे. या वणव्याशी झुंजणाऱ्या अग्निशमन दलाचे अधिकारी आणि लोकांचे झालेले नुकसान याबाबत सहानुभूती दर्शवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी दंडावर काळ्या फिती बांधून  मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सिडनी कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. सामना सुरू व्हायच्या आधी राष्ट्रगीतासाठी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा ते दंडावर काळ्या फिती बांधूनच उतरले होते. एस.सी.जी ट्रस्ट आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये सुरू होणारी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून वणवा पीडितांसाठी मदत उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी घातलेल्या टीशर्टवर त्यांनी सही केली असून ते शर्ट लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या वणव्यात परिसरात हजारो नागरीक अडकले असून त्यात अनेक घरे नष्ट झाली आहे. अनेक नागरीक नववर्षदिनी वणव्यांमुळे जीवाच्या भीतीने किनारी भागाकडे पळाले आहेत. या लोकांना लष्कराच्या जहाजांमार्फत आणि विमानांमार्फत मदत पाठवण्यात येत आहे. या मदतीमध्ये अन्न, पाणी इंधनाचा समावेश आहे. वणव्यामुळे अनेक भागांचा संपर्क खंडीत झाला असल्याने हवाई मार्गे मदत पाठवण्यात येत आहे.

ही आग आता समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मल्लकूटा शहरात पोहोचली आहे. पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या मल्लकूटा शहरात पर्यटनासाठी आलेले तब्बल तीन हजार पर्यटक आगीत अडकले असून त्यांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र सातत्याने हवामानात होणारा बदल आणि जोरदार हवेमुळे आग पसरत असल्याने बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुट्टी घालवण्यासाठी ऑस्ट्रेलियात आलेल्या तीस हजार पर्यटकांना लवकरात लवकर सुरक्षितस्थळ गाठण्याचे आवाहन ऑस्ट्रेलियन सरकारने केले आहे. याबद्दल बोलताना व्हिक्टोरिया येथील आपातकालिन विभागाचे ज्येष्ठ अधिकारी अॅड्र्यू क्रिस्प यांनी सांगितले की मल्लकूटा येथे तीन दल तैनात असून समुद्र किनाऱ्यावर चार हजार पर्यटकांची सोय करण्यात आली आहे. पण जंगलात आग वेगात पसरत असल्याने अनेक पर्यटक भरकटले आहेत. त्यांना शोधून काढणे हे बचाव पथकापुढे मोठे आव्हान आहे. न्यू साऊथ वेल्स येथील गावांमध्ये आग वेगाने पसरत आहे. तर ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहात असल्याने येथील तीस हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या