ऑस्ट्रेलियन ओपनची राणी पुन्हा ओसाका, जेतेपदाच्या लढतीत जेनिफर ब्रॅडीवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानची 23 वर्षीय टेनिसपटू नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपनची नवी राणी बनली. नाओमी ओसाका हिने महिला एकेरीच्या शनिवारी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या 25 वर्षीय जेनिफर ब्रॅडीवर 6-4, 6-3 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला आणि झळाळत्या करंडकावर मोहोर उमटवली. हे तिचे ऑस्ट्रेलियन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेचे दुसरे अजिंक्यपद ठरले हे विशेष. याआधी तिने 2019 साली पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. तसेच नाओमी ओसाका हिने चौथ्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावरही नाव कोरले. याप्रसंगी दोन ऑस्ट्रेलियन जेतेपदांसह दोन अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धाही जिंकण्याची करामत तिने करून दाखवली आहे.

एक तास व 17 मिनिटांमध्ये विजय

तिसरी सीडेड नाओमी ओसाका हिने 22 व्या सीडेड जेनिफर ब्रॅडी हिला फायनलमध्ये सहज नमवले. जपानी टेनिसपटूच्या झंझावाती खेळासमोर जेनिफर ब्रॅडीचा निभाव लागला नाही. नाओमी ओसाका हिने ही लढत एक तास व 17 मिनिटांमध्ये जिंकली.

आकडेवारीवर एक नजर

  • खेळाचा भाग ब्रॅडी ओसाका
  • एसेस 2 6
  • दुहेरी चुका 4 2
  • ब्रेक पॉइंटमध्ये विजयी 50 80
  • विनर्स 15 16
  • एकूण विजयी पॉइंट 54 69
  • वेगवान सर्व्हिस 184 197

जेनिफर ब्रॅडीला ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याआधी दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागले होते. त्यामुळे दोन आठवडे ती सरावापासून दूर होती. पण त्यानंतरही तिने या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. ही वाखाणण्याजोगी बाब. भविष्यात या टेनिसपटूकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरणार नाही.