
सामना प्रतिनिधी । मेलबर्न
वर्षातील पहिल्या टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. यावेळी रॉजर फेडरर व सेरेना विल्यम्स या दोन दिग्गज टेनिसपटूंना विक्रम खुणावतोय. एकीकडे रॉजर फेडररला 100 वे एटीपी जेतेपद पटकावण्याचे वेध लागलेत, तर दुसरीकडे सेरेना विल्यम्स मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्यासाठी सज्ज झाली असेल.
जगभरातील टेनिसप्रेमींकडे ‘फॅबफोर’ला एकत्र बघण्याची अखेरची संधी असणार आहे. रॉजर फेडरर, रफाएल नदाल, नोवाक जोकोविच व ऍण्डी मरे हे चार महान खेळाडू एकत्र येण्याची ही शेवटचीच खेप असणार आहे. ग्रेट ब्रिटनच्या ऍण्डी मरेने ऑस्ट्रेलियन ओपन ही कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा असल्याचे सांगितल्यामुळे टेनिसच्या क्षितिजावर पुन्हा त्याचे वादळ घोंघावणार नाहीए.
महिलांमध्ये सेरेना विल्यम्ससमोर कॅरोलिन वोझनियाकी व सिमोना हालेपचे आव्हान असणार आहे. यावेळी सेरेना विल्यम्सच्या खेळाकडे सार्या जगताचे लक्ष यावेळी असेल. बघूया ती मार्गरेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी करतेय का ती…



























































