World Cup Final 2023 Ind vs Aus –ऑस्ट्रेलियाचा जगज्जेतेपदाचा षटकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धूळधाण उडवत हम से पंगा मत लेना मेरे यार असे पुन्हा एकदा सांगितले.

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे माफक आव्हान ठेवल्यानंतर सर्वांच्या आशा-आकांक्षा शमी-बुमरा-सिराज या त्रिकुटावर होत्या. बुमरा-शमीने निराश केले नाही. त्यांनी स्वप्नांची ज्योत पेटवताना पन्नाशीतच ऑस्ट्रेलियाच्या तिघांना बाद करत भन्नाट आणि सुसाट सुरुवात करून दिली, पण त्यानंतर ट्रव्हिस हेडने हिंदुस्थानच्या एकाही गोलंदाजाला आपल्यासमोर टिकू दिले नाही. त्याने मार्नस लाबुशनच्या साथीने सहजपणे खेळ करत प्रत्येक धावागणिक संघाला जगज्जेतेसमीप नेण्याची किमया साधली. ही जोडी फुटेल आणि हिंदुस्थान जगज्जेतेपदाच्या ट्रकवर येईल असे सारखे वाटत होते, पण हेडचा खेळ इतका जबरदस्त होता की अधूनमधून चौकार-षटकाराचे हल्ले चढवत त्याने हिंदुस्थानचे नशीबच पह्डले. त्याचा प्रत्येक प्रहार हिंदुस्थानची जगज्जेतेपदाची भूक संपवत चालला होता आणि ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा जगज्जेते बनवण्याचा करिश्मा केला. 15 चौकार आणि 4 षटकारांची दिमाखदार खेळी केल्यावर केवळ विजयी धाव काढण्यापूर्वी तो 137 धावांवर बाद झाला. मग ग्लेन मॅक्सवेलने ते सोपस्कार पूर्ण केले.

त्याआधी पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांचे डोळे वटारले होते. खेळपट्टी आपला रंग दाखवणार याची कल्पना होती. कर्णधार रोहित शर्मा आपल्या नेहमीच्याच शैलीत मैदानात अवतरला. पण पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने केलेला पायचीतचा अपील हृदयाचे ठोके चुकवणारा होता. पहिले षटक भन्नाट गेल्यानंतर दुसऱया षटकात रोहितने आपल्या बॅटीचे रंग दाखवले, पण शुबमन गिलने आज निराशा केली. फायनलचा प्रेशर त्याला सहनच करता आला नाही. त्याने चाचपडण्यापूर्वीच स्टार्कच्या चेंडूवर आत्महत्या करत हिंदुस्थानी डावाला निराशाजनक सलामी दिली. गिल गेल्यानंतर रोहितने आपली शैली बदलली नाही. तो सुसाटच खेळत होता. त्याची एक चूक संघाला महागात पडू शकत होती, पण त्याने दुर्लक्ष केले. तेव्हाच ग्लेन मॅक्सवेलला सलग चौकार-षटकार ठोकल्यानंतर रोहितने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याऐवजी चेंडूवर हल्ला करणेच कायम ठेवले. त्यात चुकीच्या चेंडूची निवड आणि ट्रव्हिस हेडने पकडलेला अफलातून झेल सामन्याला कलाटणी देणारा ठरला.

जरी रोहितने 31 चेंडूंत 47 धावा केल्या असल्या तरी त्याचा आत्मघातकी खेळ आणि त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी दबावात खेळावरचे गमावलेले नियंत्रण संघासाठी घातक ठरले. गेल्या दोन सामन्यांत शतके ठोकणारा श्रेयस अय्यर मोक्याच्या क्षणी अपयशी ठरला. मग विराट कोहली आणि केएल राहुलचा संघर्ष हिंदुस्थानची धावगती मंदावतच नेत होता. दोघांनी हिंदुस्थानचा धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांना जखडूनच ठेवले होते. गेल्या दहा सामन्यांत हिंदुस्थानची फलंदाजी कोसळूनही सावरली होती ती जगज्जेतेपदाच्या लढतीत सपशेल अपयशी ठरली.
विराटचे खेळपट्टीवर टिकून राहण्याचे प्रयत्न कमिन्सच्या एका चेंडूने हाणून पाडले. विराटसुद्धा टिकू शकला नाही. त्यानंतर संघाला सावरण्याची सर्व जबाबदारी राहुलवर पडल्यामुळे तो भेदरला. तो उभा राहिला, पण धावा काही त्याला काढता आल्या नाहीत. पण त्याने हिंदुस्थानच्या डावाला खोलात नेले. त्याला प्रत्येक धावेसाठी झगडावे लागले. त्यातच त्याच्या जोडीला ना रवींद्र जाडेजा उभा राहिला ना सूर्यकुमार यादव.ज्या संघाच्या टॉप फाइव्हने गेल्या दहा सामन्यांत जो धावांचा पाऊस पाडला होता त्या टॉप फाइव्ह फलंदाजांच्या झऱयाला अचानक ओहोटी लागली. राहुलने 107 चेंडूंत 66 धावा केल्या खऱया, पण जेव्हा त्याच्याकडून चौकार-षटकारांची गरज होती तेव्हा तोसुद्धा आपली विकेट फेकून परतला. आज सूर्यकुमार यादवलाही आपले महत्त्व दाखवण्याची सुवर्ण संधी मिळाली, पण त्याने संधीचे मातेरे केले. हा कुठेही फटका मारणारा 28 चेंडूंत केवळ 18 धावाच करू शकला आणि हिंदुस्थानने कसेबसे 240 धावांपर्यंत मजल मारली. इथेच हिंदुस्थानने आपल्या जगज्जेतेपदाच्या स्वप्नांवर पाणी ओतले होते. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूडने 7 विकेट घेत सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीनेच ऑस्ट्रेलियाच्या जगज्जेतेपदाचा पाया रचला.

2011 सालापासून यजमानांचे जगज्जेते होण्याची मालिका अखेर ऑस्ट्रेलियाने खंडित केली. 2011 साली यजमान हिंदुस्थान, 2015 साली यजमान ऑस्ट्रेलिया आणि 2019 साली यजमान इंग्लंड जगज्जेता ठरला होता, पण यंदा यजमान हिंदुस्थान अजिंक्य ठरू शकला नाही. यजमान अंतिम फेरीत हरण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी 1979 साली यजमान इंग्लंड हरला होता. त्यानंतर एकाही यजमानावर अशी नामुष्की ओढावली नव्हती.

स्पर्धेत नॉनस्टॉप विजय मिळविल्यानंतर केवळ अंतिम फेरीत हरणारा हिंदुस्थान दुसराच संघ ठरला आहे. 2015 मध्ये न्यूझीलंडने सलग आठ विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती आणि त्यांचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच जगज्जेतेपदाची लढत हरला होता. त्या स्पर्धेतही साखळीत ऑस्ट्रेलियाला सहा सामन्यांत चारच विजय मिळविता आले होते, पण ते जगज्जेते ठरले होते.