
डेव्हिड वॉर्नरची आणखी एक दमदार खेळी आणि मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व केन रिचर्डसन यांनी केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी येथे झालेल्या लढतीत श्रीलंकेचा 7 गडी व 14 चेंडू राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने खिशात घातली. डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची ‘सामनावीर’ व ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
श्रीलंकेकडून मिळालेले 143 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 3 गडी गमावत ओलांडले. डेव्हिड वॉर्नरने 50 चेंडूंत 1 षटकार व 4 चौकारांसह नाबाद 57 धावांची खेळी केली. कर्णधार ऍरोन फिंचने 37 धावांची आणि ऍश्टन टर्नरने नाबाद 22 धावांची खेळी केली.


























































