
हिंदुस्थान हा इस्लामपेक्षाही जुना आहे, हे सगळय़ांनी नम्रपणे मान्य केले पाहिजे. त्याचबरोबर कश्मीरच काय पण पाकिस्तानही हिंदुस्थानचाच भाग आहे. कश्मीर कधीच पाकिस्तानी होऊ शकत नाही, असे ऑस्ट्रेलियातील मुस्लीम धर्मगुरू इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने या विरोधात जगभर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, त्याला सगळय़ांनीच सुनावले आहे. 370 कलमावरून तौवहिदी यांनी ट्विटमध्ये म्हटले, ‘कश्मीर कधी पाकिस्तानचा भाग नव्हताच आणि या पुढेही असणार नाही. पाकिस्तान आणि कश्मीर दोन्ही हिंदुस्थानचेच भाग आहेत. मुस्लिमांनी हिंदू धर्म सोडून ते इस्लाममध्ये आले असले तरी संपूर्ण भूभाग हा हिंदूंचा असल्याचे सत्य बदलता येणार नाही. हिंदुस्थान हा पाकिस्तानच काय तर इस्लामपेक्षाही जुना आहे, हे मान्य करायला हवे.’
राहुल गांधी शत्रूची बाजू घेतात
राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी राहुल गांधी शत्रूची बाजू घेतात. स्वतःच्या स्वार्थासाठी राहुल आणि सोनिया गांधी कॅमेऱयासमोर येऊन रडतात, असा आरोप तौवहिदी यांनी केला. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी त्यांचे संबंध आहेत. ते मुरब्बी राजकारणी नाहीत, असेही ते म्हणाले.
जवानांच्या पाठीवर डोवालांची कौतुकाची थाप
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवण्याआधीपासून कश्मीरमध्ये ठाण मांडून बसलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी सीआरपीएफचे जवान आणि पोलिसांबरोबर दुपारचे जेवण घेतले. कश्मीरमध्ये काल बकरी ईद त्यांच्यामुळे शांततेत पार पडली. जवान 16 ते 17 तास कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे त्यांनी कौतुक केले. कश्मीर खोऱयात सैन्य दलांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम ते करत आहेत.