उद्याची शेती – डिजिटल रूपातील पारंपरिक चावडी

<<< रितेश पोपळघट >>>
[email protected]

पारंपरिक चावडीला आधुनिक डिजिटल रूप देत ग्रामीण भागात ज्ञान, माहिती आणि मैत्रीचा एक नवा प्रवाह निर्माण करणारा ‘ही मैत्री विचारांची’ हा समूह. शेतकऱ्यांना सर्वांगीण दृष्टीने सक्षम करीत कृषी क्षेत्रातील सर्व बदल, नवकल्पना आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरित व शिक्षित करणे हाच या समूहाचा मुख्य उद्देश आहे.

भारतीय शेती ही केवळ आर्थिक क्षेत्र नाही, तर ती आपल्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि सामाजिक नात्यांचा कणा आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान झपाट्याने पुढे गेले, पण शेतकऱ्याच्या अडचणी मात्र तशाच राहिल्या आहेत. हवामानात होणारे बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, कृषी निविष्ठांचे वाढते दर आणि चुकीच्या व सोशल मीडियाच्या युगातदेखील माहितीतून होणारे अपरिमित नुकसान या सर्व गोष्टींना शेतकरी बळी पडतो आहे.

निराशेच्या सर्व प्रवाहात एका डिजिटल शेतकरी समूहाने पारंपरिक चावडीला आधुनिक डिजिटल रूप देत ग्रामीण भागात ज्ञान, माहिती आणि मैत्रीचा एक नवा प्रवाह निर्माण केला आहे. त्याचे नाव ‘ही मैत्री विचारांची’. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वांगीण दृष्टीने सक्षम करणे, सोबत कृषी क्षेत्रातील सर्व घटकांना नवकल्पना आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरित व शिक्षित करणे असा उद्देश घेऊन हा समूह काम करतो आहे. समूहाची सुरुवात सोशल मीडियातील व्हाट्सअ‍ॅप ग्रुपपासून झाली. काही प्रगतीशील शेतकरी एकत्र आले आणि शेतीविषयक अनुभव, फोटो, प्रयोग, प्रश्नोत्तरे यांची विनिमय प्रक्रिया सुरू होती. मात्र काही मर्यादा जाणवत होत्या.

2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे तृणमूल काँग्रेस या पक्षासाठी काम करत होते. ‘क्लब हाऊस’ नावाच्या एका सोशल ऑडिओ अ‍ॅपवर प्रशांत किशोर काही पत्रकारांसोबत चर्चा करत होते. या ‘क्लब हाऊस’ चॅटमधील ऑडिओ क्लिप्सचा एक भाग लीक केला. या लीक झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला, पण वादाचा भाग या सर्व शेतकरी वर्गाला फायदा करून देणारा ठरला. बाजारभाव अभ्यासक दीपक चव्हाण सर यांनी ऑडिओ अ‍ॅपची माहिती शेतकरी वर्गाला करून दिली आणि या ऑडिओ माध्यमावर हा खुला व 24 तास चालणारा मंच उभा राहिला आणि तेथून हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात आज नवीन अध्याय सुरू झाला आहे.
आज देशभरातील महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, गुजरात, केरळ ते बिहारपर्यंत चार हजारांपेक्षा अधिक शेतकरी या डिजिटल चावडीशी जोडले गेले आहेत. दिवसाच्या सर्व प्रहरांत येथे चर्चा सुरू असतात. कोणी रात्री पाणी देत असताना ऑडिओवर तज्ञांचे मार्गदर्शन ऐकत असतो, तर कोणी सकाळी खतांच्या मात्रांवर अनुभवी शेतकऱ्यांशी चर्चा करत असतो. इंटरनेटच्या उपलब्धतेचा प्रभाव ग्रामीण भारताचा चेहराच बदलत आहे आणि हा समूह त्याचे ठोस उदाहरण आहे.

या डिजिटल मंचावर होणाऱ्या चर्चांचे विषय अत्यंत विस्तृत असतात. विविध पिकांचे तंत्रज्ञान, रोग-कीड नियंत्रण, हवामानाचा अंदाज, बाजारभाव, बियाणे-खते उपलब्धता तसेच नव्या तंत्रज्ञानाची ओळख, एआय, ड्रोन, नवीन बायोफर्टिलायझर्स, स्मार्ट इरिगेशन असे सगळे विषय तज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी बांधव यांच्या चर्चेतून येथे समजावून घेता येतात. विविध वैज्ञानिक, कृषी तज्ञ, कृषी अधिकारी, आणि प्रगतीशील शेतकरी आपले ज्ञान मोकळेपणाने देतात. करोडो रुपये खर्च करून शासकीय यंत्रणांना जे काम करता आले नाही ते या समूहाने कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय करून दाखविले आहे.

विशेष म्हणजे या समूहात केवळ माहितीपुरती चर्चा नाही, तर मानसिक आधाराचा एक अनोखा धागाही आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, पीक नुकसान, कर्जाचा भार ही स्थिती शेतकऱयाला मानसिकदृष्ट्या खचवते. अनेक शेतकरी हताश होऊन टोकाचा मार्ग निवडतात. अशा वेळी या समूहातील तरुण आणि अनुभवी शेतकरी एकत्र येतात, एकमेकांना मदत करतात. त्याचे स्वरूप कधी आर्थिक, तर कधी धीर देणे जरी असले तरी काही गंभीर प्रसंगांत या समूहाने अनेक शेतकरी आत्महत्या वाचवल्याची नोंद स्वत सदस्यांनी केलेली आहे. मूल्यांच्या पातळीवर या समूहाची दृष्टी खूप स्पष्ट आहे. राजकारण नाही, धर्म-जात नाही. एकच ओळख ती म्हणजे ‘मी शेतकरी’. ही भावनिक ओळखच येथे एकोप्याचे बळ निर्माण करते. शेती हा व्यवसाय नाही, ती जीवनशैली आहे. त्यातील वेदना, आनंद आणि संघर्ष हे इथले प्रत्येक सदस्य समजतो. त्यामुळे येथे केवळ ज्ञान नाही, तर दिशा मिळते.

समूहाचे उपक्रमही विशेष आहेत. वार्षिक कौटुंबिक स्नेहमेळावे, पिकांची प्रात्यक्षिक शिबिरे, कृषी प्रदर्शनांना सामूहिक भेटी, महिला शेतकऱ्यांसाठी विशेष व्यासपीठ, तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन आणि रासायनिक साक्षरतेचे अभियान हे नावीन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत. पीकनिहाय उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांचे अनुभव कथन प्रकाशित करणे हेदेखील समूहाचे वैशिष्ट्य आहे.

राष्ट्रीय पातळीवरील अनेक माध्यमांनाही या उपक्रमाची विशेष दखल घ्यावी लागली. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सुरू झालेली ही चळवळ आता सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरे, गरजूंसाठी मदत, विद्यार्थ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करते. समूहातील अनेक शेतकरी बांधवांना आणि समूहाला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

आज भारतीय शेती एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे. हवामान बदल, जागतिक स्पर्धा, उत्पादन खर्च वाढ आणि बाजारपेठेतील अनिश्चितता या आव्हानांना उत्तर देण्यासाठी केवळ सरकारी योजना पुरेशा नाहीत. शेतकऱ्यांमध्ये सामूहिक ज्ञान, अनुभव, नवतेचे स्वागत आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची मानसिकता आवश्यक आहे. ‘ही मैत्री विचारांची’सारखे समूह या नव्या कृषी व्यवस्थेचे अनौपचारिक, पण अत्यावश्यक घटक बनत आहेत. भारतीय ग्रामीण समाजात परिवर्तन हे नेहमीच खालीपासून वरच्या दिशेने घडते. माणसामाणसांतल्या संवादातून, आपुलकीतून, सहकार्याच्या भावनेतून होते. सोशल मीडिया अनेकदा नकारात्मकतेचे दोष झेलतो; पण योग्य वापर झाला तर तो परिवर्तनाचे शक्तिशाली साधन ठरू शकते हे या शेतकरी समूहाने ते दाखवून दिले आहे.

शेतीतील प्रगती ही केवळ उत्पादन वाढवण्याने नाही, तर विचारांतील बदलाने होते. माहिती मिळवण्याची उत्सुकता, प्रयोग करण्याची हिंमत आणि अपयशातून शिकण्याची तयारी ही शेतकऱ्याची खरी संपत्ती आहे आणि ही संपत्ती हजारो शेतकऱ्यांच्या हाती आज ‘क्लब हाऊस’च्या माध्यमातून आली आहे. आज शेतकरी स्वतचे हक्काचे माध्यम उभा करू शकतो आणि तेही कोणत्या शासकीय मदतीशिवाय हे वाखाणण्याजोगे आहे.

(लेखक शेती क्षेत्रात कार्यरत असून ‘द फार्म’ या स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत.)