
<<< वर्णिका काकडे >>>
जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची बोलीभाषा दर 12 कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. महाराष्ट्राला खेटून असलेल्या कर्नाटकातल्या कानडीचा प्रभाव मराठीवर झालेला दिसून येतो. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण बोली म्हणजे बेळगावी मराठी बोली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठीवर प्रामुख्याने कोकणी, कन्नड, उर्दू, फारसी आणि इंग्रजी या भाषांचा प्रभाव आहे तर तिथल्या मराठीनेही कन्नड भाषेवर जम बसवला आहे. तीच ही बेळगावी मराठी.
भाषेविषयी या भागाचा अभ्यास करताना या परिसरातील शिलालेख आणि कागदोपत्री लिखित इतिहास सापडतो, जो अगदी इ. स. चौथ्या ते पाचव्या शतकापासून अभ्यासता येतो. या संदर्भांनुसार येथे अंमल असणाऱ्या राजसत्तांच्या कालक्रमानुसार भाषेत बदल होत गेले. हे बदल भाषा आदानप्रदानानुसार कायमस्वरूपी रुजले असे दिसून येते.
बदलत्या राजकीय सत्तांसोबतच या प्रदेशातील लिंगायत, जैन धर्म, कश्मिरी आणि दक्षिणी ब्राह्मणी शैव या परंपरांमधूनही भाषेत बदल घडत गेले. तसेच भाषेवर सांस्कृतिक परिणामही दिसून येतो. जसे या परिसरातील कन्नड भाषिकांचा प्रभाव येथील मराठीवर दिसतो. व मराठीचा प्रभाव कन्नड भाषेवर दिसतो. उदा. कन्नड व्याकरणात स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी ही तीन लिंगवचने वापरली जातात. त्यानुसारच वस्तूंचा किंवा व्यक्तींचा उल्लेख केला जातो. मराठीत प्रामुख्याने स्त्रीलिंगी व पुल्लिंगी ही दोनच लिंगवचने वापरली जातात. त्यामुळे, इथल्या मराठीत पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी उच्चारणाला नपुंसकलिंगी पद्धतीनेही उच्चारले जाऊ शकते. उदा. ‘ते शर्ट’, ‘ते कार’ असे सहज म्हटले जाते.
तसेच यात शब्दांची मोडतोडही दिसते. जसे. इथल्या कन्नड भाषेत ढगाला ‘मोड‘ म्हणतात, तर मराठी भाषेत ‘माड‘ म्हणतात. ‘माज’ (मला), तुज (तुला), कास (कशाला), यासारखे शब्द किंवा त्यांना लागलेले प्रत्यय थेट कन्नड प्रभावित आहेत, तर काही शब्द फारसीचा प्रभाव जाणवून देतात. बेळगावी बोली ही मराठी भाषेची बोली असली तरी, कन्नड भाषेच्या प्रभावामुळे तिचे उच्चारण विशिष्ट असते. यात हेल काढण्याची एक वेगळी पद्धत आहे.

























































