
वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी असलेल्या टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सची (टीकेएम) घोडदौड सुरू असून ऑगस्ट महिन्यात त्यांनी तब्बल 14 हजार 959 गाडय़ांची विक्री केली आहे. मागील वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये 12 हजार 772 गाडय़ांची विक्री केली होती. त्यामध्ये सध्या 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीचा विचार करता मागील वर्षीच्या तुलनेत 68 टक्क्यांनी वाढ नोंदली आहे.
वाढलेल्या विक्रीमध्ये ग्राहकांकडून इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर या गाडय़ांना ग्राहकांची मोठी पसंती असल्याचे टीकेएमचे सह उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले. टोयोटाच्या गाडय़ा आरामदायी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत असल्यानेच त्या ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. तसेच गाडय़ांची वाढती विक्री ही टोयोटा-किर्लोस्कर मोटार्सचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दर्शवत असल्याचेही सूद यांनी स्पष्ट केले आहे.




























































