
खास घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी तब्बल दोन वर्षांच्या प्रयोगानंतर कोल्हापूर महानगरपालिकेकडून आज स्वयंचलित यांत्रिकी पद्धतीने केलेले मूर्तींचे विसर्जन यशस्वी आणि लक्षवेधी ठरले. राज्यात प्रथमच अशा यांत्रिकी पद्धतीने मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे गणेशभक्तांकडून महापालिकेच्या या नाद खुळा उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
प्रत्येक क्षेत्रात सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधनाची भर घालणाऱया कोल्हापूरकरांनी आता घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी थेट स्वयंचलित यांत्रिकी पद्धत अवलंबली आहे. शहरातील घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरातील इराणी खाणीत करण्यात येते. येथे दरवर्षी सुमारे 15 ते 20 हजार मूर्तींचे विसर्जन होते. यासाठी 24 तासांहून अधिक वेळ लागत होता. शिवाय मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महानगरपालिका प्रशासनावर नियोजनाचा मोठा ताण पडत होता. त्यामुळे कमी वेळेत कुणाच्याही भावना न दुखावता गणपतींचे विसर्जन व्हावे, यासाठी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या संकल्पनेतून स्वयंचलित यांत्रिकी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. गेली दोन वर्षे त्यांनी यासंदर्भात इराणी खाण येथे प्रायोगिक चाचणी करून पाहिली.
तासाला तीन ते साडेतीन हजार गणेशमूर्तींचे विसर्जन
तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी याची दखल घेऊन जिल्हा नियोजन मंडळामार्फत नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत आर्थिक निधीची तरतूद केली. त्यानुसार पुणे येथील व्हीव्हीएन कन्व्हेअर्स कंपनीशी संपर्क करून सुमारे 83 लाख रुपये किमतीचे स्वयंचलित यंत्र खरेदी केले. या यंत्राद्वारे टप्प्याटप्प्याच्या अंतरावर खाणीत सुमारे 35 फूट अंतरापर्यंत एका तासाला तीन ते साडेतीन हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इतर आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या स्वयंचलित यंत्रणेद्वारे श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होते.




























































